School Reopen: राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार; रविवार, शनिवारीही भरणार शाळा

School Reopen: राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार; रविवार, शनिवारीही भरणार शाळा

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेत आहे. राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या अनुषंगाने काल, गुरुवारी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने, १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील प्रत्यक्ष स्वरुपात शाळा यंदा ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून यामध्ये शनिवारी पूर्णवेळ आणि रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षरित्या शाळा सुरू करण्यात आल्या. राज्याचा शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सर्वसाधारपणे प्रत्येक वर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाते. पण या शैक्षणिक वर्षांमध्ये मार्च ते एप्रिलपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे एप्रिलच्या अखेरपर्यंत शनिवारी शाळा पूर्ववेळ आणि रविवारी ऐच्छिक स्वरुपात सुरू ठेवण्याचेही आदेश दिली आहेत.

या निर्णयाविरोधात शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त

राज्यातील पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात घेण्यात याव्यात. तसेच या परीक्षांचा निकाल मे महिन्यामध्ये जाहीर करण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शाळांनी परीक्षेची तयारी केली असून विद्यार्थ्यांची उजळणीही सुरू केली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 139 नवे रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू


First Published on: March 25, 2022 8:52 AM
Exit mobile version