राज्यात शाळांचा श्रीगणेशा २७ जानेवारीपासून, मुंबईत मात्र शाळा बंदच

राज्यात शाळांचा श्रीगणेशा २७ जानेवारीपासून, मुंबईत मात्र शाळा बंदच

राज्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार 27 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. मात्र, त्याचवेळी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने अन्य राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी शाळेत तर मुंबईतील विद्यार्थी घरीच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरला सुरू करण्यात आले. मुंबई व ठाणे वगळता संपूर्ण राज्यातील जवळपास 90 टक्के शाळांमधील वर्ग सुरू झाले आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी वर्षा गायकवाड व उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरू करण्याची सर्व तयारी ही स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली. मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांची संमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, शाळा सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय पुढे ढकलला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. त्यातच राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी या शिक्षण मंडळाना मुंबईमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्यास नुकतेच मुंबई महापालिकेने परवानगी दिली होती. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची आलेली दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये 16 जानेवारीपासून मुंबई महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत.

एकूण शाळा
शाळा        1,06,491

पाचवी ते आठवीची विद्यार्थी संख्या

वर्ग          विद्यार्थी
पाचवी     19,98,966
सहावी     19,74,024
सातवी     19,50,828
आठवी    19,23,182
एकूण      78,47,000


 

First Published on: January 16, 2021 7:45 AM
Exit mobile version