सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू ? शिक्षण विभागाने पाठवला मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू ? शिक्षण विभागाने पाठवला मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याकडे तमाम पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असताना येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्याचेही यात सुचविण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणार्‍या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर तसेच ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ व्हायला लागल्यानंतर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, शिक्षक तसेच पालक संघटनांकडून सातत्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णांत घट दिसायला लागली असून बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची जास्त गरज भासत नाही. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

पहिली ते बारावीचा समावेश
त्यामुळे येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. पहिली ते बारावीच्या इयत्तांचा यात समावेश असेल. तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर म्हणजे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनीच परिस्थिती पाहून घ्यावा, असेही प्रस्तावात आहे, असेही प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्या एसओपी आधी ठरविल्या आहेत, त्या कायम राहणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

First Published on: January 20, 2022 5:10 AM
Exit mobile version