Pen Yatra News : पेण तालुक्यात 17 एप्रिलपासून यात्रांचे दिवस, ‘या’ गावांमध्ये भरणार यात्रा

Pen Yatra News : पेण तालुक्यात 17 एप्रिलपासून यात्रांचे दिवस, ‘या’ गावांमध्ये भरणार यात्रा

संग्रहित छायाचित्र

वडखळ : चैत्र महिन्यात ठिकठिकाणी यात्रा भरत असतात. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणार्‍या यात्रांचे ग्रामीण भागात मोठे अप्रूप असते. पेण तालुक्यातही ठिकठिकाणी दरवर्षी यात्रा भरत असून, श्रीराम नवमीपासून बळवली येथून या यात्रांचा शुभारंभ होत आहे. यात्रांची ही धूम १० मेपर्यंत सुरू राहणार आहे.

वाशी, वढाव, बोरी, कळवे, रावे, दादर यासह इतर गावांमध्ये होणार्‍या यात्रांना मोठी गर्दी उसळत असते. दरवर्षी यातून कोट्यवधी रुपयांची उलाढालही होत असते. एकीकडे सुरू झालेला चैत्र महिना आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम असतानाच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तानंतर रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे.

हेही वाचा… Pen Summer News : गरिबांच्या फ्रिजला ‘अच्छे दिन’

महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी आणि कार्ला गडावरील आगरी-कोळी बांधवांची इष्टदेवता श्री एकवीरा देवीचा यात्रा उत्सव समाप्त होताच विविध ठिकाणच्या स्थानिक ग्रामदेवतांच्या यात्रांना सुरुवात होणार आहे. यंदाच्या यात्रांचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीच्या धामधुमीत 23 दिवस ग्रामदेवतांच्या यात्रांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

यामधून ग्रामदेवतांचा उत्सव साजरा करण्यात येणार असून, यासाठी त्या-त्या ठिकाणच्या ग्रामस्थ आणि पंच कमिटीने यात्रांसाठी देवांचे मानपान, इतर आवश्यक बाबींची जय्यत तयारी सुरू केली आहे. यामुळे यात्राप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ग्रामदेवतांच्या यात्रेत व्यापाराला चालना मिळणार असल्याने व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

हेही वाचा… Raigad Forest News : रायगडमधील वनक्षेत्र अधिक हरित, वन्यप्राण्यांमध्ये 15 टक्के वाढ

प्रभू श्रीरामांचे मंदिर असलेल्या आणि तालुक्यातील प्रति अयोध्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या बळवली गावातील यात्रा बुधवारी (१७ एप्रिल) आहे. या यात्रेसाठी केवळ तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील भाविक हजेरी लावतात. १८ एप्रिल रोजी दादर येथील ग्रामदेवतांची यात्रा असून, वढाव येथील श्री काळभैरव देवाची यात्रा २१ एप्रिल रोजी आहे. तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी वाशी येथील श्री वरसूबाय जगदंबा भवानी देवीची यात्रा सोमवार २२ एप्रिल रोजी आहे.

आकाश पाळणे, मनोरंजनांचे खेळ, तसेच मेवा-मिठाईची दुकाने यांनी या यात्रेचा संपूर्ण परिसर गजबजतो. उंच काठ्या उभारणे हे या यात्रेचे वैशिष्ट्य असते. याच दिवशी गडब येथे श्री काळंबादेवीची यात्राही भरते. या यात्रेत उंचच उंच देवकाठ्यांची स्पर्धा हे मुख्य आकर्षण आहे. या देवकाठ्या स्पर्धेची जोरदार तयारी ग्रामस्थ करत आहेत. या यात्रेला गडबसह कारावी आणि कासू परिसराप्रमाणे मुंबई, ठाण्यातील हजारो भाविकही हजर असतात.

हेही वाचा… Raigad Anganwadi Sevika : अंगणवाडीसेविकांच्या हाती स्मार्टफोन

२३ एप्रिल रोजी बोरी येथील श्री आक्कादेवीची, पांडापूर गावची यात्रा आहे. तर कळवे गावातील यात्रा श्री हनुमान जयंतीच्या दिवशी आहे. वरेडी येथील श्री काळभैरव देवाची यात्रा २५ एप्रिलला आहे, तर कोलेटी येथील यात्रा २८ एप्रिल रोजी भरणार आहे. मे महिन्यात रावे गावच्या आई रायवादेवीची यात्रा बुधवार ८ मे रोजी भरणार आहे. भव्य काठ्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.

त्यानंतर जिते गावची श्री सत्यनारायण देवाची यात्रा ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, शुक्रवार १० मे रोजी भरत असते. या यात्रेनंतर तालुक्यातील यात्रोत्सवाची समाप्ती होणार आहे. दरम्यान, या यात्रा आनंदी वातावरणात पार पडाव्यात, कायदा आणि सुव्यवस्थेला कुठे गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी आतापासूनच योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

First Published on: April 15, 2024 8:05 PM
Exit mobile version