घरमहाराष्ट्रRaigad Forest News : रायगडमधील वनक्षेत्र अधिक हरित, वन्यप्राण्यांमध्ये 15 टक्के वाढ

Raigad Forest News : रायगडमधील वनक्षेत्र अधिक हरित, वन्यप्राण्यांमध्ये 15 टक्के वाढ

Subscribe

रायगड जिल्ह्यातील माथेरान, कर्नाळा, फणसाड आदी अभयारण्यात विविध प्रजातीच्या पशु-पक्ष्यांचा वावर वाढला. लोकजागृती झाल्यामुळे स्वयंपाकासाठी होणारी जंगलतोडही 90 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आली आहे, ही जमेची बाब आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जंगल संरक्षणासाठी वनविभागाकडून केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. सामाजिक वनीकरण आणि पश्चिम घाटाचा भाग असलेल्या रायगड जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण कमी झाले आहे. स्वयंपाकासाठी जंगली लाकडाचा वापर ९० टक्क्यांवरूव २० टक्क्यांवर आल्यामुळेही वनक्षेत्र बहरू लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रातून गायब झालेली गिधाडे, गवे, नीलगाय, सांबर, चितळ आदी प्राण्यांचे पुन्हा आगमन झाले आहे.

निसर्गप्रेमी, सर्पमित्र आणि सिस्केपसारख्या वन्यजीव संस्थांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे रायगडमधील वनचित्र पालटले आहे. पूर्वी मांडूळ, घोरपड, खवलेमांजर यासारख्या सरपटणारे प्राणी तस्करीत सापडायचे. आता तस्करीमध्येही घट झाल्याचा वनविभागाने दावा केला आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण १७२५.४४ चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी १३४.६५ चौरस किमी क्षेत्र राखीव आहे. यात फणसाड वन्यजीव आणि कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश आहे. अभयारण्य परिसरातील लोकांमध्ये वृक्षतोडीबाबत झालेली जनजागृती, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत उपाययोजनांमुळे वन्यप्राण्यांची संख्या तीन वर्षांत १५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Teachers News : देशाचं भविष्य घडवणाऱ्या गुरुजींची अल्प वेतनावर गुजराण

जंगल वाढल्याने रोजगार

माथेरान, कर्नाळा, फणसाड यांसारख्या अभयारण्यांमध्ये प्रचंड वनसंपदा आहे. हिरवीगार झाडे, विविध प्रजातींच्या पशुपक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यासक, पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे शिवाय जमेची बाब म्हणजे वनसंवर्धनाची मानसिकता वाढू लागली आहे. कांदळवन क्षेत्रात उपजीविकेची साधने निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्याचबरोबर रोजगाराची पर्यायी साधने निर्माण झाल्याने आदिवासींकडून होणारी वृक्षतोड कमी झाल्याचा वन अधिकार्‍यांचा दावा आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Poladpur Heat News : उन्हामुळे पोलादपूरकरांच्या अंगाची काहिली

रायगड जिल्ह्यातील जंगलात आजमितीस १७ प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असणारा झुबकेदार शेपूट असणारा राज्यप्राणी शेकरूचे (मोठी खार) दर्शन येथील अभयारण्यांत होते. शेकरूची घरटी उंच झाडावर वैशिष्टपूर्ण अशी पानांनी मढलेली असतात. फणसाडमध्ये भल्या पहाटे किंवा सायंकाळी अभयारण्यातील प्रमुख शिकारी प्राणी, बिबट्याचे दर्शन अनेकदा पर्यटकांना होते. भारतातील सर्वात मोठे हरिण-सांबर आणि जगातील सर्वात छोटे हरिण-पिसोरी हे दोन्ही याच अभयारण्यात आढळून येतात. एकमेव उडू शकणारा सस्तन प्राणी वटवाघळाची पॅटेड बॅट या प्रजातीची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. याशिवाय रानससा, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा हे वन्यप्राणीही आढळतात. फणसाड अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून रानगव्यांची संख्या वाढत असून निरीक्षणात साधारण २० रानगवे आढळले आहेत. जानेवारी २०२० पासून रानकुत्र्यांचीही संख्याही वाढत आहे.

फुलपाखरे आणि सर्प

फुलपाखरांच्या ९० हून अधिक प्रजातींची कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यात नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनसह भारतातील सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल इथे आढळतात. अभयारण्यात कॉमन मॅप, ग्रेट ऑरेंज टीप, ब्लू ऑक लिफ, कॉमन नबाब, प्लस ज्युडी, सायकी ही फुलपाखरे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात पतंगाच्या विविध प्रजातींचे निरीक्षण सहज होते. सर्पांमध्ये घोरपडीसह हरणटोळ, तस्कर, धामण, अजगर, असे बिनविषारी तर नाग, घोणस, फुरसे, मण्यार, चापडा यांसारखे विषारी सर्प अशा २७ प्रकारच्या सापांची नोंद करण्यात आहे.

किलबिलाट

जिल्ह्यातील विविध जंगलांमध्ये 164 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद आहे. गिधाडे सर्वत्र नामशेष होण्याच्या मार्गावर असताना इथे पांढर्‍या पाठीच्या गिधाडांचे अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या संवर्धनासाठी व्हल्चर रेस्टॉरंटची संकल्पना राबवण्यात आली आहे. फक्त पश्चिम घाटातच आढळणार्‍या पक्ष्यांसह उत्तर-पूर्व भारतातून हिमालयापासून आणि हिवाळ्यात सैबेरियातून स्थलांतर करून येणारे पक्षीही दिसून येतात. पांढर्‍या पोटाचा निळा माशीमार, पांढर्‍या गालाचा कटुरगा पिवळ्या भुवईचा बुलबुल, विगोरचा शिंजीर, वनधोबी, भारतीय नीलदयाल, गप्पीदास, निलगिरी रानपारवा, बेडूकमुखी पक्षी, धीवर, धनेश आदी असंख्य पक्षी नजरेस पडतात.

समृद्ध वनसंपदा

जिल्ह्यातील फणसाड, कर्नाळा अभयारण्य आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे यासारखे शिकारी पक्षी तर सातभाई, बुलबुल असे पक्षी दिसू लागले आहेत. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ यांसारखे गाणारे पक्षी अभयारण्यात येणार्‍या पर्यटकांची करमणूक करतात. याबरोबरच नीलगाय, गवा, भेकर यांसारखे प्राणी नागरी वस्तीत वावरताना दिसतात. बिबट्याचा वावर वाढला असता तरी मनुष्यावर प्राणघातक हल्ल्याची एकही घटना दीड वर्षात घडलेली नाही.

वन्यदिनाचे महत्त्व

जगभर 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वन्यजीवांचे रक्षण, संवर्धन, त्यांचे अन्नसाखळीतील महत्त्व, वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आजची स्थिती या विषयावर प्रबोधन केले जाते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 2013 च्या अधिवेशनात, 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित करण्यात आला. नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा 3 मार्च 1973 रोजी 180 देशांनी मान्य केला, म्हणून या दिवसाला महत्त्व आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -