ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, भेटीतील चर्चेबद्दल कुतूहल

उज्जल निकम

एकेकाळी विशेष सरकारी वकील म्हणून काम करणारे ज्येष्ठ विधिज्ञ वकील निकम यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ही भेट गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर झाली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उज्ज्वल निकम यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरु आहे. त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

शिंदे गटासाठी निकम कायदेशीर कौशल्य पणाला लावणार? –

उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू मांडली आहे. एखादा खटला त्यांच्याकडे गेला की त्याचा निकाल सरकारच्या बाजूने लागणार, असे गृहीतच धरले जायचे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात उज्ज्वल निकम एकनाथ शिंदे गटासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावणार का, याविषयी आता चर्चांना सुरुवात झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ततर झाले. त्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता आणि शिवसेना कोणाची, हा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. या सगळ्या नाट्यावर उज्ज्वल निकम यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर कायदेशीर बाबी उलगडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कायदेशीर अनुभवाचा फायदा घेणार, अशी चर्चा सुरू आहे.

First Published on: August 5, 2022 10:02 AM
Exit mobile version