एसटी कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल

एसटी कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल

(फोटो प्रातिनिधिक आहे)

पगारवाढीसहित इतर मागण्यांकरता एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं होतं. सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, अशा प्रमुख मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन केले होते. संपाच्या निर्णयानंतर एसटीच्या काही संघटनांची आपापसात वादावादी देखील झाली होती. संपाच्या पहिल्या दिवसापासूनच संप करणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्याचा बडगा देखील उचलण्यात आला होता. सरकारने आता आणखी कठोर पावले उचलत संपात सामील झालेल्या १ हजार ५०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ३७२ एसटी कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संपामुळे एसटी महामंडळाचे नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले होते. ८ आणि ९ जून दरम्यान झालेल्या संपामुळे शिवशाहीसह इतर एसटी गाड्यांचे देखील नुकसान झाले. ९० एसटी गाड्यांमध्ये १९ शिवशाही बसेसचा देखील समावेश होता. तर संप केल्याने एसटीचा तब्बल ३३ कोटी रुपयांचा महसुल देखील बुडाला असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले संप

एसटी कर्मचाऱ्यांनी या आधी देखील अनेक संप पुकारले होते. १९७२ साली कर्मचाऱ्यांनी १२ दिवसांचा सर्वात मोठा संप पुकारला होता तर १९९६ आणि २००७ साली देखील संप पुकारण्यात आले होते. याशिवाय गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भर दिवाळीच्या सणात पाच दिवसाचा संप पुकारण्यात आला होता. ऐन दिवाळीत संप पुकारण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. या संपाच्या दरम्यान सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार देखील कापण्यात आला होता.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे

कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, याकरता एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र या संपात गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मुक्त करण्यात आले असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. मात्र या संपात ज्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून याबाबतचा निर्णय एक दोन दिवसात घेण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिंत सिंह देओल यांनी दिली आहे.

First Published on: June 14, 2018 10:37 AM
Exit mobile version