‘कुलभूषण जाधवांच्या वेळेस 56 इंची छाती 15 इंचांवर कशी येते’

‘कुलभूषण जाधवांच्या वेळेस 56 इंची छाती 15 इंचांवर कशी येते’

पुलवामा हल्ल्याचा बदला आपल्या सैनिकांनी घेतला. पाकिस्तानच्या ताब्यातील विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाली आणि पंतप्रधान मोदी सांगू लागले की त्याला मी शोधून आणला. गेल्या तीन वर्षापासून कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्यांना मोदी साहेब का शोधून आणू शकले नाहीत? तेव्हा ही 56 इंची छाती 15 इंचांवर कशी आली? याचाच अर्थ कतृर्त्व आणि शौर्य सैन्याने गाजवले आणि त्याचे श्रेय मोदी आणि भाजपा घेत आहे… अशा मार्मिक शब्दांत आज माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा समाचार घेतला. अलिकडेच वर्धा येथील सभेत मोदींनी पवारांना ‘लक्ष्य’ केले होते.

उमरगा येथे आज राणा जगजीतसिंह यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळेस त्यांनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या नोटबंदी आणि चुकलेल्या कृषी धोरणांचा भरपूर समाचार घेतला. ते म्हणाले की मोदी एकच गोष्ट सगळीकडे सांगत आहेत की कॉँग्रेसने 70 वर्षांत काय केले? मला एकच सांगायचे आहे त्यांना की या काळात पाच वर्षे अटलबिहारी वाजपेयी सुद्धा पंतप्रधान होते. मग त्यांनी झोपा काढल्या असे म्हणायचे का? असे प्रश्न आम्ही विचारणार नाही. मात्र पाच वर्षे काय केले हे सांगण्यासारखे नसल्यानेच मोदी साहेब विरोधकांवर टिका करतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक भाषणात ते हेच बोलतात, या शब्दांत श्री पवार यांनी पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढविला.

मोदीसाहेब शेतकरी, तरुण मुलांचे प्रश्न, बेरोजगारी, पाणी याबाबत बोलत नाहीत. ते केवळ एकच काम करतात. ते म्हणजे गांधी नेहरू घराण्याला शिव्या घालणे. मोदींना भारताचा इतिहास तरी माहीत आहे का? असा सवाल करून पवार म्हणाले की इंदिरा गांधींनी पाकिस्तानशी युद्ध करून केवळ इतिहास नाही, तर भूगोलही घडवला. एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान झाले. हे मोदी साहेबांना ठाऊक नाही.? आम्ही देशाचे संरक्षण केले आणि सैन्याचे कौतुकही केले, पण त्याचा राजकीय फायदा घेतला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदींचा विमान प्रवास आणि शेतकरी आत्महत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात 92 वेळा विमानप्रवास केला. त्यासाठी 2 हजार 21 कोटी रुपये जनतेचा पैसा खर्च झाला. मात्र त्यांनी निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणण्याचा जो वायदा केला होता, त्यातील एक रुपयाही भारतात त्यांना आणता आलेला नाही. याऊलट नोटबंदी सारखा निर्णय देशावर लादून लोकांना तीन तीन आठवडे रांगेत उभे केले. त्यात 100 जणांचे मृत्यू झाले, नोटबंदीनंतर 15 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला, याकडेही श्री पवार यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर फडणवीस सरकारच्या काळशत गेल्या दोन वर्षांत 11 हजार 998शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही भाजपाचे नेते सांगतात की आम्हाला मते दया. नवीन उद्योग आणि शेतीकडे लक्ष नाही, बेरोजगारी कमी करायची नाही, दुसरीकडे माणसामाणसांत जाती-धर्माची भांडणे लावायची आणि विद्वेष पसरविण्याचे काम करायचे असे असूनही भाजपाला सत्ता हवी आहे, कारण त्यांना सत्तेचा गैरवापर करायचा आहे, असा घणाघाती हल्लाही पवार यांनी भाजपावर चढविला.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपा का हरली?

सहा महिन्यांपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थानसारख्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला याकडे लक्ष्य वेधून शरद पवार म्हणाले की मोदी सरकार येण्यापूर्वी देशावर पावणेतीन लाख कोटींचे कर्ज होते. मोदींच्या काळात हेच कर्ज 5 लाख 40 हजार कोटीपर्यंत पोहोचले आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त कर्जबाजारी देश झाला आहे. दुसरीकडे देशातील 77 टक्के संपत्ती फक्त 10 टक्के लोकांकडे आहे, अशी आकडेवारीही श्री पवार यांनी यावेळी सादर केली. दरम्यान मध्यंतरी राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांबदद्दल केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

First Published on: April 4, 2019 2:26 PM
Exit mobile version