वातावरण सरकार विरोधी, पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती – शरद पवार

वातावरण सरकार विरोधी, पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

लोकसभा निवडणुकांच्या एकूण ७ टप्प्यांपैकी सर्वात मोठ्या टप्प्यासाठी २३ एप्रिल म्हणजेच मंगळवारी मतदान होत आहे. यामध्ये एकूण ११५ जागांसाठी मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातल्या १० जागांचा समावेश आहे. त्यात अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होत आहे. त्यातच शरद पवार जिथून निवडणूक लढणार असं म्हणत प्रतिष्ठेचा केलेल्या माढा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. यावेळी इव्हीएम मशिन आणि त्यात होऊ शकणारा संभाव्य घोटाळा हा मुद्दा बराच चर्चेत असून खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर त्यावर शंका उपस्थित केली. मुंबईत विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे. ‘देशात आणि राज्यात जनमत सरकारविरोधी आहे. मात्र, इव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते’, अशी भीती यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, सीपीआय(एम) महेंद्र सिंग, पीसीसीच्या शांती चौहान, तृणमूल काँग्रेस खासदार नझमूल हक, भारतीय मुस्लिम लिगचे कोरम ओमर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य डॉ. जी.एच. फर्नांडिस,लोक तांत्रिक जनता दलाचे आमदार कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी.के.एस. इलांगोवल, सीपीआय महाराष्ट्रचे प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, ‘मी अनेक मतदारसंघामध्ये फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते. त्यामुळे या ईव्हीएम घोटाळ्याची भीती वाटते.’

चंद्राबाबू नायडूंचा सरकारवर घणाघात

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्राबाबू नायडू यांनी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. ‘एखाद्या राजकीय पुढाऱ्याने जर आवाज उचलला तर त्याच्या घरी ईडी किंवा आयकर विभाग धाड टाकतो. तीच अवस्था सनदी अधिकाऱ्यांची देखील आहे’, असं म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी ‘देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात’, असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘आयकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड होत आहे. आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जाऊ शकते’.

अखिलेश यादव, सीताराम येचुरी यांनी देखील ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘महाराष्ट्रात भाजपची अवस्था वाईट आहे. इथे सर्व जागा आघाडीने जिंकल्या पाहिजेत. उ.प्र.मध्ये देखील त्यांच्याविरोधात वातावरण आहे. मग भाजपला मतदान कसे होणार? फक्त फक्त ईव्हीएम मशीन्स हॅक करुनच भाजपला मतदान होऊ शकतं’, अशी भूमिका यावेळी सर्व विरोधी पक्षांनी एकमताने मांडली.

First Published on: April 23, 2019 4:34 PM
Exit mobile version