शरद पवारांचा मोठा दावा; संपूर्ण देशाची जबाबदारी घेऊ शकेल असा एकही पक्ष नाही

शरद पवारांचा मोठा दावा; संपूर्ण देशाची जबाबदारी घेऊ शकेल असा एकही पक्ष नाही

संग्रहित छायाचित्र

मुंबईः लोकांना बदल हवा आहे. मात्र आता एकही पक्ष असा नाही जो संपूर्ण देशाची जबाबदारी घेऊ शकेल. काही पक्ष आहेत. पण त्यांची सत्ता त्या- त्या राज्यांमध्ये आहे. या सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले, कर्नाटक विधानसभेमुळे विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळाले आहे. मात्र संपूर्ण देशाची जबाबदारी घेऊ शकेल, असा एकही पक्ष नाही. काही पक्ष आहेत. पण त्यांची सत्ता त्या- त्या राज्यांमध्ये आहे. त्या सर्वांना एकत्र करणं. त्यांच्याशी संपर्क करणं हे काम सध्या सुरु आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सर्व विरोधकांना एकत्र करत आहेत. बैठका सुरु आहेत. हे काम लगेच होणार नाही. पुढचे तीन ते चार महिने सर्व विरोधकांना एकत्र काम करावे लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

मी कर्नाटक विधानसभेच्या शपथविधी सोहळ्यालाही जाणार आहे. आम्ही सर्व विरोधक जाणार आहोत. विरोधकांना एकत्र करण्याचे नियोजन केले जाईल, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकलेल्या १९ जागांवर आगामी निवडणुकीतही आमचाच उमेदवार असेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीत जागा वाटपावर कोणतीच चर्चा झालेली नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. प्रत्येकाला त्याच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसून यावर सामंजस्याने तोडगा काढू, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळाले. त्यानंतर शरद पवार यांनी महविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची तातडीने बैठक बोलावली. उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्यावर बैठकीत चर्चा झाली. संजय राऊत यांनी लोकसभेच्या १९ जागांवर दावा केल्याने महाविकास आघाडीत फुटीची चर्चा सुरु झाली.

First Published on: May 19, 2023 7:35 PM
Exit mobile version