धनंजय मुंडेंना शरद पवारांकडून   क्लीन चिट

धनंजय मुंडेंना शरद पवारांकडून   क्लीन चिट

बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी क्लीन चिट दिली आहे. मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे गुरुवारी सांगणार्‍या पवार यांनी, याप्रकरणी वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावे लागेल. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हणत तूर्तास तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंडे प्रकरणी मीडियाला संबोधताना शरद पवार म्हणाले की, आरोप करणार्‍या व्यक्तींच्या सदर्भात अजून तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचे कारण नाही; पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची महिला अधिकारी असावी असे सुचवले आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

आरोप करणार्‍यावर एकाहून अधिक आरोप झाले त्याबाबतही सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. आरोप झाला म्हणून सत्तेपासून दूर व्हा असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण शाहनिशा करुन पुढची पावले टाकणार आहोत, असे सांगत शरद पवार यांनी धनंजय मुंडे पदावर कायम राहतील, असे सूचक विधान केले. ज्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यांची अस्वस्थता समजू शकतो. ती गेल्यामुळे नाराजी असणार. त्यासाठी ज्यांनी हे सगळे काम केले असेल त्यांना टार्गेट करुन त्यांना ठोकण्याचे काम करणे हे फारसे वेगळे समजत नाही. हे राजकारणात आक्रमपणे आरोप करणे आणि भूमिका घेण्याचा भाग आहे, असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला. एफआयआर दाखल होत नसल्याच्या तक्रारदार महिलेच्या आरोपावर ते म्हणाले की, ही दोन,तीन उदाहरणे आली नसती तर वेगळी चर्चा झाली असती. साहजिकच तपास करणार्‍यांना अधिक काळजीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही यावर भाष्य करण्याची गरज नाही. मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, ते सत्य समोर आणतील.

राजीनाम्यासाठी भाजप महिला आघाडी आक्रमक

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप महिला मोर्चा सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. सामाजिक न्यायासारखे महत्त्वाचे खाते सांभाळणार्‍या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी जाहीर केले.

नामांतराकडे मी गांभीर्याने बघत नाही

महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केले नाही.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

करूणा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. दोन्ही सख्ख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार कुणालाही मिळत नाही. कुणीही आम्हाला नोटीस दिलेली नाही. पोलिसांकडून नोटीस येईल तेव्हा त्यावर बोलू. मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देऊ, याबाबत शनिवारी पत्रकार परिषद घेतली जाईल.

-रमेश त्रिपाठी, रेणू शर्माचे वकील.

First Published on: January 16, 2021 7:00 AM
Exit mobile version