मला लाल शाईची सवय; हिरव्या शाईचा विचार कधी केला नाही – शरद पवार

मला लाल शाईची सवय; हिरव्या शाईचा विचार कधी केला नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून या सरकार स्थापनेच्या केंद्रस्थानी असणारे शरद पवार आणि संजय राऊत हे अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. निमित्त होतं शिक्षक भारतीच्या अधिवेशनाचं. या अधिवेशनात या दोघांनी शिक्षकांच्या मागण्यांवर आपली भूमिका मांडली. आपण राज्य सरकारकडे शिक्षकांच्या या मागण्यांचा पाठपुरावा करू, असं आश्वासन यावेळी या दोघांनी व्यासपीठावरून दिलं. मात्र, त्यासोबत त्यांनी केलेल्या कोट्या आणि कोपरखळींनी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. विशेषत: शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे उपस्थितांसोबतच व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये देखील हास्याची लकेर उमटली.

हिरव्या शाईचा विचारही नाही!

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी संजय राऊतांच्या एका कोपरखळीवर धम्माल कोटी केली. ‘शिक्षकांच्या मागण्यांच्या कागदावर शरद पवारांनी लाल आणि हिरव्या शाईने टिकमार्क केली आहे, हे मी पाहिलंय’, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. मुख्यमंत्र्यांची सवय आहे की फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही लाल शाईची असते, मंत्र्यांची निळ्या शाईची असते आणि राज्यपालांची हिरव्या शाईची असते. आम्ही हिरव्या शाईचा विचार कधी केला नाही. पण तेव्हापासून मला लाल शाईची सवय लागलेली आहे. पण मला कळत नाही की इथे बसलेलो असताना मागण्यांच्या कागदावर मी टिक करताना कुणाला दिसू नये, याची काळजी घेत होतो. पण तेवढ्यात राऊतांची तिकडे कशी नजर गेली. माझ्या मते राऊत ज्या शाळेत होते, तिथल्या परीक्षा पद्धतीची चौकशी झाली पाहिजे. कारण, समोरचा उत्तर लिहिताना हळूच पाहणं असं काही झालं असेल, तर पाहावं लागेल’, अशी कोपरखळी शरद पवारांनी मारली.

‘मला कमळ दिसत नाही’

शाळांमध्ये मुलांच्या पाठ्यपुस्तकात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’, अशा कविता होत्या. त्यावर देखील शरद पवारांनी यावेळी बोलताना अप्रत्यक्षपणे भाजपला खोचक टोमणा मारला. ‘माझ्या लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत. माझा जन्म झाला, तेव्हा मी ७ दिवसांचा होतो. माझी आई स्कूलबोर्डमध्ये असायची. तिला शिक्षणामध्ये फार रस होता. सावित्रीबाई फुले तिच्या आदर्श होत्या. स्कूल बोर्डाची मीटिंग लागली, तेव्हा माजी आई ७ दिवसांच्या बाळाला घेऊन मीटिंगला गेली. ते ७ दिवसांचं बाळ म्हणजे मी. ज्यानं ७ दिवसांचा असताना ज्यानं स्कूल बोर्डाची मीटिंग पाहिली, त्याला कमळ कशाला दिसतंय? त्याला शिक्षणाशी संबंधित गोष्टीच दिसतात’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – अभिनेता सुबोध भावे साकारणार शरद पवार…!
First Published on: February 8, 2020 6:49 PM
Exit mobile version