शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा

शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा

महाविकासआघाडी सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, असा गंभीर इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. या सगळ्याची बांधणी त्यांनीच केली. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे, हेदेखील शरद पवार यांचेच काम आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

शरद पवारांची भेट घेतली, मोदींची भेट घेणार का?
यावेळी प्रसारमाध्यमांनी उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, हा प्रश्न राजकीय नाही, हा राजकीय मुद्दा नाही. राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. या समाजासाठी सत्तेत जे आहेत महाराष्ट्रात, पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी, ती होताना दिसत नाही.

मी पवारसाहेबांना सांगितले की आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला दिले पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

First Published on: February 12, 2021 5:30 AM
Exit mobile version