माथाडी कामगारांना न्याय मिळवून देणारच – जयंत पाटील

माथाडी कामगारांना न्याय मिळवून देणारच – जयंत पाटील

माथाडी कामगारांना न्याय मिळवून देणारच - जयंत पाटील

गेले वर्षभर कोरोनाने लोकांना छळले आहे. कामगार आणि श्रमिक आज अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. माथाडी कामगारांची देखील बिकट परिस्थीती आहे. परंतु शेकाप या माथाडी कामगारांना न्याय मिळवून देणारच, अशी ग्वाही शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी दिली. ज्योतीपाल निकाळजे या माथाडी कामगार नेत्याने बॅलार्ड इस्टेट येथे शेकापमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. शेकापचे तत्वज्ञान कष्टकरी आणि श्रमिकांना न्याय देणारे आहे. त्यामुळेच पूर्वी या पक्षाने राज्य केले आहे. मात्र आता पक्षाची ताकद क्षीण होत असली तरी पुन्हा तरूणांच्या बळावर पक्ष भरारी घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यकत केला.

सत्तेसाठी आज अनेक कार्यकर्ते या पक्षांतून त्या पक्षांत उडया मारतात. परंतु शेकापने गरीबांसाठी काम केले आहे आणि करत आहे. परंतु आमच्या पक्षांने कधी तडजोडीचे राजकारण केले नाही. आज दिन दुबळ्या लोकांवर अन्याय होत आहे. मात्र त्यांना न्याय देण्याचे काम आमच्या सारखेच कार्यकर्ते करतात. सुरक्षेच्या कड्यामधून फिरणारे नेते श्रमिकांना न्याय मिळवून देतील का? असा सवाल करून त्यांनी आपण २५ वर्ष श्रमिकांसाठी आणि शोषितांसाठी काम करत आहे. त्याचे आम्हाला समाधान वाटत आहे. शेकापमध्ये येईल त्यांना न्याय मिळेलच, पण कोणी आले नाही तरी त्यांनी हाक द्यावी. त्यांच्यासाठी आपण रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबदल बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत असाच कारभार राहिला तर शेतकऱ्यांची अजून अवस्था बिकट होईल, त्यामुळे त्यांच्या पाठीशी प्रत्येकाने उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. ज्योतीपाल निकाळजे यांनी अन्य पक्ष झोपडीधारक आणि माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरल्यानेच आपण शेकापमध्ये प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले. मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शेकापमध्ये प्रवेश केला. यावेळी बॅलार्ड इस्टेट विभाग लाल सलाम… लाल सलाम या घोषणांनी दणाणून गेला. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र कोरडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

First Published on: February 17, 2021 10:21 PM
Exit mobile version