नाशिक जिल्ह्यात शिवसेनेत खांदेपालट सुरूच

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेत खांदेपालट सुरूच

नाशिक : शिवसेनेचे आमदार दादा भुसे, सुहास कांदे यांच्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुखांचेे खांदेपालट केल्यानंतर आता सहसंपर्कप्रमुख, संघटक, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुखांची नियुत्या जाहीर झालेल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सोमवारी (दि.18) जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यात अल्ताफ खान यांची दिंडोरी, कळवण व बागलाण विधानसभेच्या सहसंपर्कपदी नियुक्ती करण्यात आली. सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक यांच्याकडे नांदगावसह मालेगाव बाह्य व मध्य या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली. माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे हेे येवला, निफाड, चांदवड या तीन विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. तसेच संघटक म्हणून संजय कटारिया यांच्याकडे नांदगाव, मालेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हाप्रमुखांची निवड झाल्यानंतर आता उपजिल्हाप्रमुखपदी संतोष बळीद (नांदगाव, मालेगाव बाह्य) यांची नियुक्ती करण्यात आली. नांदगाव तालुकाप्रमुखपदी संतोष गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. सुहास कांदे हे आमदार होण्यापूर्वी संतोष गुप्ता यांच्याकडेच तालुकाप्रमुख पदाची सुत्रे होती. मध्यंतरी त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अखेर आमदार कांदे व संतोष गुप्ता यांची दीलजमाई झाली आणि गुप्ता पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता पक्षाने पुन्हा त्यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासोबत उपतालुकाप्रमुख म्हणून न्यायडोंगरीचे शशी मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर मनमाड शहरप्रमुखपदी मयूर बोरसे यांची निवड झाल्याचे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून जाहीर करण्यात आले आहे.

First Published on: July 19, 2022 1:43 PM
Exit mobile version