मुंबई पालिकेतील सेना कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

मुंबई पालिकेतील सेना कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

मुंबई पालिकेतील कार्यालयात शिवसेना आणि शिंदे गटामध्ये राडा झाला असून दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकरत्यांसह एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मुंबई पालिकेतील सेना कार्यालयावर शिंदे गटाकडून कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संतप्त सेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटांमध्ये शाब्दीक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. दरम्यान, पालिकेतील राड्याबाबत कळताच बाळासाहेबाच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकत्यांना बाहेर काढले असून परिस्थिती निय़ंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

विधानसभेतल्या कार्यालयावरुनही असाच राडा दोन्ही गटात झाला होता. आता शिंदे गटाचा डोळा पालिकेतल्या सेना कार्यालयावर असल्याचा आरोप होत आहे. या राड्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली. त्यानंतर या राड्यासंबंधी बोलताना शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले की आम्ही फक्त आयुक्तांकडे पालिकेच्या कामासंदर्भातील आढावा घेण्यासाठी आलो होतो. ताबा आम्ही घेतलेला नाही. दरम्यान, राहुल शेवाळे यांच्याबरोबरच शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे आणि प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच य़शवंत जाधव हे देखील पालिकेत उपस्थित आहेत.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी शिंदे गटातील ४ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राळ उठवली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह , अब्दुल सत्तार, राहुल शेवाळे, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांचाही समावेश आहे. परिणामी यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिंदे गटाने आज पालिकेत राडा घातला अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

 

 

 

 

 

First Published on: December 28, 2022 6:03 PM
Exit mobile version