वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी, शिवसेनेला धक्का

वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी, शिवसेनेला धक्का

शिंदे गटाने शिवसेनेला आज पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन शिंदे गटाने हकालपट्टी केली आहे. वरूण सरदेसाई यांची हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता पक्षाचे खासदारही एकनाथ शिंदे गटात सामील होत असल्याने उद्धव ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी सरसावले आहेत. आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी ते ऑनलाईच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. लोकप्रतिनिधी गेले असले तरी संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत.

एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंनी अनेक आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवक यांची हकालपट्टी केली होती. त्याचप्रमाणे आता शिंदे गटाने युवासेनेकडून हकालपट्टी करण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गटाकडून युवासेनेमध्ये किरण साळी यांना महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची?, यावरून नवीन अंकाला सुरूवात झाली आहे.

शिवसेनेला धक्के बसत असतानाच शिंदे गटाला सुद्धा एक मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या तीन माजी नगरसेवक शिवसेना सोडून भाजपात सामील झाले आहेत. माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते या तिघांनी शिवसेना सोडून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश नसून घरवापसी असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील नवी मुंबईचे काही नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले होते. मात्र, काही माजी नगरसेवक हे भाजपात गेल्याने नवी मुंबईत शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


हेही वाचा : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये


 

First Published on: July 19, 2022 12:37 PM
Exit mobile version