महाविकास आघाडीच्या बैठकीत शिंदे समर्थकांचा राडा

महाविकास आघाडीच्या बैठकीत शिंदे समर्थकांचा राडा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक रविवारी सोलापुरात पार पडली. महाविकास आघाडीच्या या बैठकीत सुशीलकुमार शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बैठकीत बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने शिंदे समर्थकांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघडकीस आले आहे.त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यमंत्री सतेज पाटीलदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. यावेळी पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीचे पदवीधरच्या जागेसाठी अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सतेज पटील सोलापूरमध्ये आले होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये सुशीलकुमार यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बैठकीत लावलेल्या बॅनरवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सर्वप्रथम आक्रमक झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी बैठक रोखली. त्यांनी जोरदार नारेबाजी केली. बैठकीत त्यांनी ‘सुशीलकुमार शिंदे आगे बढो’ असे नारे दिले. दरम्यान, या घोषणांमुळे बैठकीत पुरता गोंधळ उडाला. मंत्री सतेज पाटील यांनी वारंवार आवाहन करुनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाद न दिल्यामुळे बैठकीतील गोंधळ वाढतच गेला.

उमेश पाटील आणि सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे बॅनरवर फोटो न लावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर झाली नाही. त्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. यावेळी फोटो न लावणे हा काँग्रेसचा अपमान असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

First Published on: November 22, 2020 11:57 PM
Exit mobile version