शिर्डी होणार लखलखीत, ‘इतक्या’ कोटींचा सौंदर्यीकरण आराखडा साईचरणी

शिर्डी होणार लखलखीत, ‘इतक्या’ कोटींचा सौंदर्यीकरण आराखडा साईचरणी

नाशिक : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यीकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी (दि.८) साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

विखे-पाटील यांनी सोमवारी सकाळी साईबाबा समाधी मंदीराचे मनोभावे दर्शन घेत शिर्डी सौंदर्यकरणाच्या आराखड्याची प्रत साईचरणी अर्पण केली. शिर्डी संस्थान सभागृहात वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकणी यांनी या सौंदर्यकरण आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता तहसीलदार अमोर मोरे उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, शिर्डी शहर, मंदिर परिसर, परिक्रमा मार्गाचे सुशोभीकरण करून ठिकठिकाणी सौंदर्यस्थळे विकसित व्हावीत यासाठी राज्यशासनाकडून शिर्डीसाठी ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मंदीरासमोरील पादचारी मार्ग, शहरातील मुख्य प्रवेश मार्ग, मुख्य चौक, मंदीर आवारातील पादचारी मार्ग, शिर्डी परिक्रमेचा १४ किलोमीटरचा मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे सुनियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामांना तीन महिन्यात सुरूवात होईल. सौंदर्यकरण, सुशोभीकरण करतांना ग्रामस्थांच्या सूचनाही गांभीर्याने विचार करण्यात येईल.
दुसर्‍या टप्प्यात शिर्डी गावाच्या मूळ ढाच्याला कोठेही धक्का लागू न देता शिर्डी शहराचा अंर्तबाह्य चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० कोटी रूपये खर्चून साईबाबांच्या जीवनाची माहिती देणारा ‘थीम पॉर्क’ उभारण्यात येणार आहे. शेती महामंडळाच्या जागेवर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी ७० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

असा आहे प्रस्तावित आराखडा

शहर नियोजक तथा वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकर्णी यांनी शिर्डी सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार केला आहे. शिर्डी साईबाबा मंदीर परिसरातील पादचारी मार्ग, परिक्रमेचा १४ किलोमीटर मार्ग, ५ एकर परिसरात साई वृंदावन पार्क विकसित करणे, दांडीच्या धर्तीवर पर्यावरणपूरक सोलर बगीचा, शहरातील प्रवेश मार्गातील चौकांमध्ये तसेच शहरातील मुख्य चौकात सौंदर्यस्थळे विकसित करणे, परिक्रमा मार्गावर त्रिकोणी खांबावर कोरीव साईचरित्र आदी विशेष कामे पहिल्या टप्प्यातील आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत. या सुशोभिकरणाच्या कामांसाठी स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेले फर्निचर, दगड, वीटांचा वापर करण्यात येणार आहे. या कामांमध्ये साईनेज डिझाईन, पुरेशा वॉश रूम, लॅडस्केपची कामे, भूयारी पादचारी मार्ग, झाडे-झुडपांसह नैसर्गिक सजावट, आकर्षक बैठक व्यवस्था, ग्राफिक्स, भित्तीचित्रे, पर्यायी मार्ग, अल्प उपहार केंद्र, विश्रांती कक्ष, मदत केंद्र, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, वॉटर पॉईंट प्रस्तावित करण्यात आले आहेत.

First Published on: May 9, 2023 1:37 PM
Exit mobile version