राऊतांच्या जामिनावर भास्कर जाधव भावूक, म्हणाले, ‘सावधान रहो शेर आ गया’

राऊतांच्या जामिनावर भास्कर जाधव भावूक, म्हणाले, ‘सावधान रहो शेर आ गया’

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊतांना अखेर 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या जामीनावर ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान शिवसेना भवनाबाहेर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, पेढे वाटून आपला आनंद साजरा करत आहे. तर ठिकठिकाणी ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्तेही आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान राऊतांचा जामीन मंजूर होताच ठाकरे गटाचे अनेक नेत्यांना आनंदाश्रू अनावर होताना दिसले. यात ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांच्यापाठोपाठ भास्कर जाधव देखील माध्यामांना प्रतिक्रिया देताना भावूक झाल्याचे दिसले. तसेच ज्यांनी संजय राऊत यांना तुरुंगात टाकलं त्यांना मी सांगतो की, सावधान रहो शेर आ गया  है, असा इशाराही भास्कर जाधवांनी दिला आहे. शिवसेना भवनाबाहेर भास्कर जाधव माध्यमांशी संवाद साधत होते. (shiv sena bhaskar jadhav first reaction sanjay raut bail goregaon patra chawl scam)

…म्हणून राऊतांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं

देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या लोकांच्या विरोधात संजय राऊत बोलत होते. लेखणीद्वारे मुद्दे मांडत होते, हे सगळं विरोधकांना थांबवता येत नव्हतं, म्हणून त्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं. असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला.

सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही

संजय राऊत सरेंडर झाले नाहीत हिंमतीने आणि ताकदीने या विरोधात उभे राहिले. माझी आणि अरविंद सावंत यांची नेते पदी निवड झाल्यानंतर तुरुंगातून संजय राऊत यांनी आम्हाला पत्र लिहिलं होतं. शिवसेनेची साथ सोडू नका, उद्धव साहेबांची साथ सोडू नका, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नका, असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं, तसेच मी लवकरच बाहेरील असं देखील सांगितलं होतं. याशिवाय सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही असंही त्यांनी पत्रात लिहिलं होतं.

सावधान रहो शेर आ गया है

ज्यांनी त्यांना तुरुंगात पाठवण्याचं षडयंत्र रचलं त्यांच्याविरोधात ते ताकदीने आता उभे राहतील. अन्यायाच्या विरोधात कसं लढावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. ज्यांनी संजय राऊत यांना तुरुंगात टाकलं त्यांना मी सांगतो सावधान रहो शेर आ गया है, अशा इशाराच भास्कर जाधव यांनी दिला आहे.


हेही वाचा : वाघाला फार काळ कोंडून ठेऊ शकला नाहीत; राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारेंना आनंदाश्रू अनावर

First Published on: November 9, 2022 3:36 PM
Exit mobile version