उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौर्‍यावर

उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौर्‍यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला नेमकी कधीपासून सुरुवात होणार याबाबत शिवसेनेकडून लवकरच अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आमदारांनी शिवसेनेसोबत फारकत घेतल्यानंतर अनेक शहरांमधील नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा बळकटी देण्याकरिता पक्षप्रमुख आता सक्रिय झाले आहेत. ते आता महाराष्ट्र दौरा करणार असून कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन मेळावे घेणार आहेत.

उद्धव ठाकरे सध्या शिवसेना भवन आणि मातोश्री निवासस्थानी सतत बैठका घेत असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज घेऊन ते महाराष्ट्र दौर्‍यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्‍यासाठी आखणी सुरू आहे. मुंबईतून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना भेटून ते बैठका घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही असणार आहेत.

First Published on: July 17, 2022 7:55 AM
Exit mobile version