शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांची निवडणूक आयोगाचा फैसला मान्य नाही-उद्धव ठाकरे

शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांची निवडणूक आयोगाचा फैसला मान्य नाही-उद्धव ठाकरे

शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाने नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे.निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेना तोडण्याचे फोडण्याचे काम जे करीत आहात त्यांना मी सांगेन की, तुम्ही मराठी माणूस आणि हिंदुत्वावर घाव घालत आहेत. भाजपला गल्लीतील कुत्रे ओळखत नव्हते. तेव्हा ज्यांनी साथ दिली त्यांनाच ते संपवत आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह शिंदे गट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खेडमधील गोळीबार मैदानावर रविवारी पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षाचे चिन्ह चोरले, पण शिवसेना चोरू शकत नाही. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करू नये. मला निवडणूक आयोगाला सांगायचे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पहायला खेडमधील सभा पहायला या. हीच खरी शिवसेना आहे. कारण शिवधनुष्य रावणाला नाही पेलवले, तर या गद्दारांना कसे पेलवणार. या मैदानाचे नावसुद्धा गोळीबार मैदान आहे. बाळासाहेबांनी मला शिकवले आहे की, ढेकणं चिरडायला तोफांची गरज नाही. ही ढेकणं आपले रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणांना चिरडणार आहे.

भाजपवाल्यांना वाटते की गोमूत्र शिंपडून स्वातंत्र्य मिळाले, पण स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालेले नाही. अनेक वीरांच्या आहुतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात नसलेल्यांनी देशाबद्दल बोलू नये, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

गुजरातमधून सरदार पटेल चोरले, बंगालमध्ये सुभाषबाबू चोरले, इकडे बाळासाहेब चोरले. हिंमत असेल तर बाळासाहेबांचे नाव न घेता मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा. यांच्यात अनेक असे आहेत ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही. ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. एक काळी टोपीवाला होता तो गेला. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा त्याने अपमान केला.

तरीही हे गद्दार काहीच बोलले नाहीत. हे केवळ दिल्लीची गुलामी करत आहेत. सर्वच उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले आहेत आणि काचा फुटलेल्या एसटीवर लिहिलेले असते की गतिमान महाराष्ट्र. कसला गतिमान महाराष्ट्र. तरुणांचे रोजगार गेले. शेतकरी हवालदिल आहे. असे असताना लाज नाही वाटत गतिमान महाराष्ट्र म्हणायला. अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याची ताकद तुमच्यात नाही. कसब्यातही पराभव झाला. त्यामुळे माझे खुले आव्हान आहे की, निवडणुका घ्या. मी मशाल घेऊन येतो. बघू कोणाचा विजय होतो, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

रामदास कदमचा धसका घेतला
या सभेसाठी बाहेरून लोकं बोलवण्यात आली, यावरून उद्धव ठाकरेंनी रामदास कदमचा किती धसका घेतला हे दिसते. उद्धव ठाकरे हा पहिला नेता असेल ज्यांनी आपल्याच पक्षातील आमदारांना संपवले. अनिल परब यांना पाठवून मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे कितीही वेळा खेडमध्ये आले तरी काहीही फरक पडणार नाही. उलट त्यांच्या येण्याने आमच्या मतांमध्ये वाढ होईल, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली.

भाजप-शिवसेना महायुतीची आशीर्वाद यात्रा
एकीकडे उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेत शिवगर्जना यात्रेला सुरुवात केलेली असताना रविवारी भाजप-शिवसेना महायुतीची ‘आशीर्वाद यात्रा’ देखील सुरू झाली. मुलुंडच्या अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बाळराजेश्वर मंदिर अशी ही यात्रा काढण्यात आली. यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार हाती धनुष्यबाण घेऊन या यात्रेत सहभागी झाले होते.

आशीर्वाद यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेना, धनुष्यबाण आणि शिवसैनिक आमच्यासोबतच आहेत. रोज उठून यांचा थयथयाट सुरूच आहे. आज फक्त जागा बदलली एवढेच. कोण लांडगे, कोण कोल्हे हे लवकरच कळेल, त्याच मैदानावर वाघाची डरकाळी ऐकायला मिळेल.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मी अभिमानाने सांगतो की बाळासाहेबांचा पुत्र आहे. बाळासाहेबही अभिमानाने सांगायचे की ते प्रबोधनकारांचे पुत्र आहे. आज ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रासाठी राबतेय. माझे भाजपला आव्हान आहे की त्यांनी शिवसेना या नावाशिवाय आणि बाळासाहेबांच्या फोटोशिवाय फक्त मोदींचा फोटो वापरून महाराष्ट्रात मते मागून दाखवावीत.
-उद्धव ठाकरे, प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

First Published on: March 6, 2023 4:45 AM
Exit mobile version