ईडीच्या चौकशीवेळी शिवसेना नेते अडसूळ यांची तब्येत बिघडली; गोरेगावच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल

ईडीच्या चौकशीवेळी शिवसेना नेते अडसूळ यांची तब्येत बिघडली; गोरेगावच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल

Anandrao Adsul: आनंदराव अडसूळांना दिलासा नाहीच, न्यायालयाने फेटाळला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज

ईडीच्या चौकशीवेळी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून त्यांना गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या प्रकरणी ईडीने आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवला आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईवेळी आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. थोड्या वेळापूर्वीच रुग्णालयामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक देखील दाखल झालेलं आहे.

आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे पडले होते. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप खासदार अडसूळ आणि त्यांच्या मुलाने फेटाळून लावले आहेत.

रवी राणा यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दबावाखाली ठेवलंय – अभिजीत अडसूळ

आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाशी संबंधित माहिती रवी राणा यांनी पेरली आहे. सुरुवातीला अटक झाल्याची बातमी पसरवली. मात्र, अटक झालेली नाही, असं अभिजीत अडसूळ म्हणाले. रवी राणा यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पैशांच्या, राजकीय दबावाखाली ठेवलं आहे, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला.

सिटी बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सर्वप्रथम आनंदराव अडसूळ यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तसंच आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी कशाप्रकारे आणि कोणी कोणी घोटाळा केला आहे, याचा उल्लेख केला आहे, असं अभिजीत अडसूळ यांनी सांगितलं.


हेही वाचा – सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी सेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलाला ईडीचं समन्स


 

First Published on: September 27, 2021 12:52 PM
Exit mobile version