Shiv Sena Dussehra Rally: आम्ही कधीही मागून वार करत नाहीत, फडणवीस लवकर बरे व्हा – संजय राऊत

Shiv Sena Dussehra Rally: आम्ही कधीही मागून वार करत नाहीत, फडणवीस लवकर बरे व्हा – संजय राऊत

खासदार संजय राऊत

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तब्येत लवकर बरी व्हावी आणि ते लवकर महाराष्ट्राच्या सेवेत यावेत, अशी प्रार्थन करतो. आम्ही कधीही मागून वार करत नाही. आम्ही समोरून वार करतो, असे सांगून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. समोर पैलवान असेल तरच लढायला मजा येते, असे सांगत राऊत यांनी सांगितले की, सरकार पडणार तर नाहीच. मात्र ५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर २५ वर्षाचा करार करुन आम्ही सत्तेवर पुन्हा येणार.

संजय राऊत यांचे संपुर्ण भाषण –

परिस्थिती चांगली असती तर जगाने दखल घ्यावी, असा दसरा मेळावा झाला असता. महा विजयादशमी मेळावा आहे. दसऱ्याचा विजय म्हणजे काय तर असत्यावर सत्याचा विजय. वाईटवर चांगल्याचा विजय. मला वाटतं या युद्धाचा प्रारंभ मागच्यावर्षी झाला. महाराष्ट्रात असत्यावर विजय मिळवून आपण आजचा दसरा मेळावा साजरा करत आहोत.

यापुढे शिवसेनेच्या इतिहासात जे होणार ते महाच होणार आहे. महाविजयदशमी, महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र. हाच महा घेऊन आम्ही दिल्लीचे तख्तही राखायला जाऊ महाराष्ट्र तर सुरुवात आहे.

मागच्यावर्षी दसऱ्या मेळाव्यात मी भाषणाच्या ओघात सांगितले होते, पुढच्या दसऱ्या मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील. ते आज खरे ठरले. शिवसेनेच्या आयुष्यातील काही संकेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षाची जो वारसा आम्हाला दिलेला आहे, त्यातूनच आम्ही असे विधान केले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजे महाराष्ट्रातील ११ कोटी जनता मुख्यमंत्री झाल्यासारखे आहे. आजचा दसरा मेळावा आणखी एका कारणासाठी विशेष आहे.

वीर सावरकर आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते आहे. वीर सावरकर आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील एक वेगळे नाते आहे. आम्हाला हिंदुत्त्वाचे प्रमाणपत्र कुणाकडून घेण्याची गरज नाही, असे जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ते सावरकरांच्या विचारातूनच म्हणाले. वीर सावरकारांना भारतरत्न द्या, अशी आम्हीच सुरुवातील पासून मागणी करत आहे. सावरकर म्हणाले देह आणि देव या प्रवासात मध्ये देश लागतो आणि आम्ही सर्व देशाचे देणे लागतो. शिवसेना देखील मागच्या एका वर्षात देशाचे आम्ही देणे लागतो, हे कामातून दाखवून देत आहेत.

कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी या प्रत्येक संकटाशी लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेही डगमगताना दिसले नाहीत. टीकेची पर्वा न करता उद्धव ठाकरे ज्या तळमळीने काम करत आहेत, त्याची नोंद घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या आत्मविश्वासाने काम केले, तो आत्मविश्वास आम्हाला बाळासाहेबांकडून मिळाला. बाळासाहेब म्हणाले तुम्ही चांगले पेरत चला, त्यातून तुम्हाला चांगलेच परत मिळेल.

कोणी कितीही कारस्थाने केली, कितीही चिखलफेक केली. तरी हे ठाकरे सरकार पाच वर्ष पुर्ण करणार. तसेच पाच वर्ष पुर्ण केल्यानंतर पुढच्या २५ वर्षांचा करार करुन पुन्हा सत्तेत येणार..

“दिल्लीत गेल्यानंतर काही खासदार म्हणतात, भाजपच्या नेत्याकडून २०० कोटी मुंबईत पोहोचले आहेत. सरकार पाडण्याचे काम सुरु होणार. मी त्यांना म्हणालो २०० कोटी बोलून आमचे महत्त्व कशाला कमी करता. सरकार पाडायचेच आहे तर दोन हजार कोटी बोला. २०० कोटीत महानगरपालिकेचेही सत्ता जाणार नाही.”

First Published on: October 25, 2020 7:28 PM
Exit mobile version