मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पंढरपूरला शिवसेनेचा मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पंढरपूरला शिवसेनेचा मेळावा

मुंबई : शिवसेनेत बंड करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, रविवारी पंढरपूरला आयोजित शिवसेनेच्या पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, हा मेळावा शिंदे यांना मानणाऱ्या कोणत्या स्थानिक नेत्यांनी आयोजित केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही. एकनाथ शिंदे हे आज, शनिवारी रात्री पंढरपुरात दाखल होत आहेत. रविवारी पहाटे शिंदे सपत्नीक विठ्ठल मंदिरात शासकीय पूजा करतील. त्यानंतर पंढरपुरात आयोजित विविध कार्यक्रमात एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी त्यांच्या पंढरपूर दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे . त्यानुसार रविवारी दुपारी साडेबारा वाजता आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यात शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वास्तविक शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय त्यांना शिवसेना नेतेपदावरून दूर करण्यात आले. शिवसेनेकडून कारवाई होऊनही एकनाथ शिंदे हे आपण अजूनही शिवसेनेत असून खरा शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा करत आहेत. याशिवाय शिंदे गटाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे चिन्ह वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून पंढरपुरात होत असलेले पक्ष मेळावा महत्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडानंतरचा हा पहिलाच पक्ष मेळावा आहे.

एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा

पंढरपूर येथे रात्री ११.३० वा. आगमन आणि शासकीय विश्रामगृह येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती

१० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी उपस्थिती

पहाटे ५.३० वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन

पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती

सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती

दुपारी १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती

First Published on: July 8, 2022 7:31 PM
Exit mobile version