NCBने पुरवलेल्या गांजाच्या नशेत ते पडतील, ठाकरे सरकार नाही; राऊतांचा विरोधकांना इशारा

NCBने पुरवलेल्या गांजाच्या नशेत ते पडतील, ठाकरे सरकार नाही; राऊतांचा विरोधकांना इशारा

NCBने पुरवलेल्या गांजाच्या नशेत ते पडतील, ठाकरे सरकार नाही; राऊतांचा विरोधकांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे लागला आहे. तसेच दुसऱ्या बाजूला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि विरोधक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एक मोठा गौप्यस्फोट किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘सरकार पाडण्यासाठी काही लोकं गांजा मारून काम करत असेल, तर आम्ही शुद्धीत आहोत. हा पकडलेला गांजा वैगरे असतो, कुठून तरी या लोकांनी आणलेला असतो. एनसीबी हा त्यांना पुरवत असते आणि त्याच गांजाच्या नशेत सरकार पाडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल. तर त्या नशेत ते पडतील, सरकार नाही पडणार.’

पुढे राऊत म्हणाले की, ‘यासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे. यासंबंधित सरकारने विचार केला पाहिजे. यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे, मग ईडी असेल, इनकम टॅक्स असेल, सीबीआय असेल. तुम्ही महाराष्ट्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय समजता? आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुमचे आमच्याकडून, आमच्या फिल्म इंडस्ट्रीकडून जे खंडणी उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत. ही सगळी कोट्यावधीची रक्कम कोणाच्या सांगण्यावरून मागितली जात आहे? काही लोकं तपास यंत्रणेच्या बाजूने उभे राहतात आणि त्यांची वकिली करतात. तुम्हाला महाराष्ट्रविषयी मुंबईविषयी प्रेम नाही, तुम्हाला राज्याचा बदनाम करणाऱ्यांविषयी उर्मी आलेली आहे. ती या निमित्ताने उघडी पडलेली आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणात सुमोटो कारवाई करावी.’

‘आम्ही भरडले जातो आहोत. केंद्रीय तपास यंत्रणांचा शिकार मी आणि माझे कुटुंब सुद्धा आहे. आम्ही सामान्य मध्यम-वर्गीय लोकं आहोत, पण ईडी समोर माझ्या कुटुंबियांना जावे लागले. ईडीसमोर आमच्या पक्षातील आणि सरकारमधील अनेक जण त्यांना सुद्धा अपमानास्पद रित्या समोर जावे लागते आहे. कोण आहात तुम्ही? ठिक आहे, उद्याचा दिवस आमचा असेल,’ असे राऊत म्हणाले.


हेही वाचा – Cruise Drugs Case: महाराष्ट्रातून फिल्म इंडस्ट्री निघून जाण्यासाठीचं हे षडयंत्र – संजय राऊत


 

First Published on: October 24, 2021 6:01 PM
Exit mobile version