साहेब उपाय सांगा, प्रवचने नकोत”, शिवसेनेचा फडणवीसांना टोला

साहेब उपाय सांगा, प्रवचने नकोत”, शिवसेनेचा फडणवीसांना टोला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करत आहेत. यावरुन आता शिवसेनेचे मुखपत्र असेल्या सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. कोरोनातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत असा टोला शिवसेनेने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास आणि फडणवीसांना लगावला आहे.

“देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत. कोरोनाशी लढताना सरकार कसं अपयशी ठरलं आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेनं केलेलं यशस्वी काम पाहायला हवं. कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनीदेखील आता दिली. कोरोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसंच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असंही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.


हेही वाचा – सत्तेचा पुरेपूर गैरवापर म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ – शरद पवार


“मुंबईतील धारावीसंदर्भात एक चांगली बातमी आली आहे. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं व त्याबद्दल शाबासकी दिली आहे. जगभरात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याचं निराशाजनक चित्र असलं तरी अजूनही त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावी येथे या रोगावर ज्या प्रकारे नियंत्रण मिळविण्यात यश आलं ते इतरांसाठी आदर्श असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमुख टेड्रोस ऍडॅनॉम ग्रेब्रेयासिस यांनी सांगितलं. धारावी हा मुंबई उपनगराचा एक भाग आहे, पण आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी नेहमीच स्वतंत्रपणे जागतिक नकाशावर येत राहिली. धारावीसारख्या अतिगर्दीच्या, नियोजन नसलेल्या, दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला व ते संक्रमण पसरले तर हाहाकार माजेल, कोरोनास येथून बाहेर काढणे कठीण जाईल असे वाटत होते, पण मुंबई महानगरपालिका व पोलिसांनी ही परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली व तेथून कोरोनास मागे रेटले,” असं सामनात म्हटलं आहे.

 

First Published on: July 13, 2020 10:12 AM
Exit mobile version