भाजपचे आजचे बाळसे ही नवहिंदुत्वाची सूज, शिवसेनेने ओढले आसूड

भाजपचे आजचे बाळसे ही नवहिंदुत्वाची सूज, शिवसेनेने ओढले आसूड

मुंबई – ‘सर्व प्रश्नांवर ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ हाच उपाय त्यांच्याकडे आहे व लोक त्यास फशी पडत आहेत. पुन्हा पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून मतांचे ध्रुवीकरणदेखील नेहमीचेच आहे. मात्र आपली हजारो हेक्टर जमीन घशात घालणाऱ्या, सतत घुसखोरी आणि सीमेवर कुरबुरी करणाऱया चीनच्या विरोधात कधी पाकिस्तानप्रमाणे ललकारी देताना भाजपवाले दिसत नाहीत. चीनने अर्धे लडाख घशात घातले तरी ‘भारत जोडो’ वर चिखलफेक करणारे गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद, हिंदुत्व येथे थंड का पडते? भारतीय जनता पक्षाकडे कोणताच विचार नाही. विरोधकांची सरकारे पाडायची व पक्ष फोडायचे यापलीकडे त्यांची अक्कल सरकत नाही,’ असा घणाघात करत भाजपाचे आजचे बाळसे ही नवहिंदुत्वाची सूज आहे, असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा – 2024 च्या कृती आराखड्याबाबत अमित शहा आणि जेपी नड्डा यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक

‘काँग्रेस तोडो भाजप जोडो’ असेच धोरण त्यांनी इतर पक्षांबाबतही राबविले. काँग्रेसने त्यांचा दलित, मुसलमान, ओबीसी हा जनाधार गमावला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे उच्चाटन झाले. हिंदू मतांचे ध्रुवीकरण इथे झाले. महाराष्ट्रात भाजपने हिंदू मतांतच फूट पाडली. आपल्या विरोधात एकाही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाने उभेच राहू नये हीच भाजपची स्वातंत्र्याची किंवा लोकशाहीची व्याख्या दिसते. त्यांना देश किंवा हिंदुत्वाशी देणेघेणे नसून हिंदू विरुद्ध मुसलमान हीच त्यांची राष्ट्रीय ऐक्याची भावना आहे. भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, पंथ, रीतिरिवाज येथे रुजले आहेत व त्यांना एकत्र ठेवून देश एकसंध ठेवावा लागेल. हा विचार नष्ट होणे म्हणजे देशात फुटीची बीजे रोवणे, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा – शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

‘देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, पण हे सर्व मुद्दे राष्ट्रीय पातळीवर उठवणारा एकही आवाज नाही. ममता बंगालात, नितीश कुमार बिहारात, केसीआर तेलंगणात, विजयन केरळात, तर शिवसेना महाराष्ट्रात आवाज उठवीत आहे. मात्र बाकीचे सर्व मांडलिक बनलेले आहेत. अशा स्थितीत राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा फलदायी ठरेल हे पाहायला हवे. मदत करता येत नसेल तर निदान अपशकुनी मांजरासारखे आडवे तरी जाऊ नये. काँग्रेस पक्ष अंतर्गत भांडणाने जर्जर झाला आहे हे खरेच आहे. तरीही राहुल गांधी एका जिद्दीने भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघाले. भाजपने त्यावर टीका सुरू करून राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशाचा नारळच वाढवला. श्री. आडवाणी यांनीही रथयात्रा काढली व त्याची फळे आजचा भाजप चाखत आहे. राजीव गांधी, चंद्रशेखर यांनी यात्रा काढल्या. आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी आणि त्यांचे चिरंजीव व सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही पदयात्रा काढली. अखिलेश यादवांनीही एकेकाळी उत्तर प्रदेशात सायकल यात्रा काढून जनमत जिंकले होते. आता महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंच्या ‘निष्ठा यात्रे’ ला उदंड प्रतिसाद लाभला. उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रेस निघणार आहेत. सध्या यात्रांचे दिवस सुरू झाले आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपास कामास लावले आहे, त्यांना ‘भारत जोडो’ चे भय वाटत आहे, हेच वास्तव आहे. राजकीय मतभेद दूर ठेवून ‘भारत जोडो’ कडे पाहायला हवे,’ असा सल्लाही शिवसेनेने या अग्रलेखातून दिला आहे.

First Published on: September 7, 2022 8:08 AM
Exit mobile version