‘मविआ’चा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

‘मविआ’चा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली. मात्र, या दोन पक्षांच्या युतीच्या दुसऱ्याच दिवशी नाराजी नाट्य सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रकाश आंबेडकरांचे हे वक्तव्य ठाकरे गटाला पटलं नसल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना खोचक सल्ला दिला आहे. (Shivsena Sanjay Raut On Vanchit Prakash Ambedkar Advice Of Sharad Pawar Statement)

खासदार संजय राऊत यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांना खोचक सल्ला दिला. “महाविकास आघाडीचा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये. शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधातल्या आघाडीच्या प्रयत्नातले प्रमुख स्तंभ आहेत. तसेच, प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाली असून, ते लवकरच महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे त्यांनी प्रमुख स्तंभांवर बोलू नये” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. हे लवकरच समजेल असा दावा त्यांनी केला होता. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभे आधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, “शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातून इनकमिंग सुरु होत आहे. शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे नगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून नेते सेनेत येणार आहेत”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंची ठाण्यात एन्ट्री अन् शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅक?

First Published on: January 26, 2023 7:11 PM
Exit mobile version