भाजप नेते कोणत्या नशेत बोलतात हे तपासावं लागेल; शिवसेनेचा खोचक टोला

भाजप नेते कोणत्या नशेत बोलतात हे तपासावं लागेल; शिवसेनेचा खोचक टोला

भाजप नेते कोणत्या नशेत बोलतात हे तपासावं लागेल; शिवसेनेचा खोचक टोला

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. या सर्वांचा शिवसेनेने आज ‘सामना’तील अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते कोणत्या नशेत बोलतात हे तपासावं लागेल, असा खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे.

“भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा. ”एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात” असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळय़ाचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

‘पदरा’आडचे नवे घाणेरडे राजकारण सुरू आहे

भाजपकडून सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या आडून जे ‘शिखंडी’ पद्धतीचे राजकारण हे लोक करीत आहेत, त्याचा बुरखाच ठाकरे यांनी फाडला. ”हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या” असा आव्हानात्मक पवित्रा ठाकरे घेतात तेव्हा भाजपने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर हल्ला करणे समजू शकतो, पण त्यांच्या कुटुंबाचाही छळ करून भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवीत आहेत. ‘पदरा’आडचे नवे घाणेरडे राजकारण सुरू आहे. पडद्यामागे पूर्वी बरेच काही घडत असे. आता पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर भाजपने सुरू केला आहे. आपल्या देशात हे नवे पायंडे भाजपने पाडले आहेत,” असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटलं आहे.

…त्यावर उपचारांची गरज

“दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?” अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कडय़ाकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली आहे व त्या घटनात्मक विधीस स्वतः फडणवीस उपस्थित होते. शपथविधीचा झगमगता सोहळा पाहून त्यांचेही डोळे दिपलेच असतील. डोळे दिपणे व डोळे फिरणे यात पुन्हा फरक आहे. महाराष्ट्रात भाजपचे डोळे फिरले आहेत. त्यातून जो तिरळेपणा निर्माण झाला, त्यावर उपचारांची गरज आहे,” असा घणाघात शिवसेनेने सामनातून केला आहे.

 

First Published on: October 18, 2021 10:14 AM
Exit mobile version