धनुष्यबाण कोणाकडे?, निवडणूक आयोगाकडे आज सादर होणार पुरावे

धनुष्यबाण कोणाकडे?, निवडणूक आयोगाकडे आज सादर होणार पुरावे

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना खरी शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार?, यावरून शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील श्रेयवादाच्या लढाईला सुरूवात होणार आहे. तसेच आजपासून निवडणूक आयोगात राजकीय नाट्य रंगणार आहे. तसेच आयोगाकडे आज दुपारपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने घाईघाईत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेकडून केली जाणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा कोणताही हक्क नाही, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. जे लोक आयोगासमोर आलेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे.

पाच ऑगस्ट रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये, असे महत्त्वपूर्ण निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तसेच हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचे की नाही, याविषयाचा निर्णयही आज होणार आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या व्हिपचे उल्लंघन करणाऱ्या शिंदे गटाला फटकारताना, मग पक्षाच्या व्हिपला काय अर्थ उरतो, असा खडा सवालच कोर्टाने केला. त्यामुळे राजकीय पक्षाकडे संपूर्ण दुर्लक्ष करूनही शकत नाही. कारण ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदविले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी शिंदेंनी केली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या कार्यवाहीला थेट स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : आज काय होणार; संजय राऊतांना ईडी की, न्यायालयीन कोठडी?


 

First Published on: August 8, 2022 9:04 AM
Exit mobile version