“पाट्याटाकू” दुकानदारांची सोमवारपासून झाडाझडती; ७ दिवसांच्या मुदतीनंतर कारवाई

“पाट्याटाकू” दुकानदारांची सोमवारपासून झाडाझडती; ७ दिवसांच्या मुदतीनंतर कारवाई

मुंबई -: मुंबई महापालिकेने दिलेली मुदत संपूनही दुकाने, हॉटेल्सवर मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक न लिहिणाऱ्या दुकानदारांची येत्या सोमवारपासून पालिकेकडून झाडाझडती घेण्यात येणार आहे. “पाट्याटाकू” दुकानदार, हॉटेल्सला आणखीन ७ दिवसांची मुदत देण्यात येणार असून, त्यानंतर पालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे.

मुंबईतील दुकानदार, हॉटेलचालक विविध आस्थापना यांनी मराठी भाषेत आणि ठळक मोठ्या अक्षरात नामफलक लिहिणे कायद्याने बंधनकारक आहे. मुंबईतील ५ लाख हॉटेल्स, दुकानदारांपैकी दोन लाख ते अडीच लाख दुकाने, हॉटेल्स याठिकाणी नियमाने मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक लावण्यात आले आहेत. मात्र पाकिकेने ३ वेळा मुदतवाढ देऊनही आणि शेवटची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपूनही उर्वरित दुकाने, हॉटेल्स यांनी अद्यापही नियमानुसार नामफलक लावलेले नाहीत.

दुकानदारांना पुन्हा एकदा मुदतवाढ हवी आहे. पालिकेने कारवाई करू नये व कारवाईला स्थिगिती मिळावी यासाठी दुकानदारांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात अंतिम लढा देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र येत्या सोमवारपासून दुकानांची तपासणी करून ज्यांनी नियमानुसार मराठीत पाट्या लावल्या नाहीत त्यांना ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही मराठी भाषेत नामफलक न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पालिका प्रशासनच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या दुकानदारांवर मेहेरबान नजरेने पाहत आहे, अशी कुरबुर नागरिकांमध्ये सुरू आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांची कारवाईची मानसिकता आहे का, अशी शँकाही उपस्थित करण्यात येत आहे.

First Published on: October 6, 2022 10:29 PM
Exit mobile version