Raigad Dhavirdev Maharaj Mhasala : श्री धावीरदेव महाराजांना यापुढे कायमस्वरुपी शासकीय मानवंदना

Raigad Dhavirdev Maharaj Mhasala : श्री धावीरदेव महाराजांना यापुढे कायमस्वरुपी शासकीय मानवंदना

श्री धावीरदेव महाराज यात्रोत्सवात रायगड पोलीस मानवंदना देतानाचा क्षण

म्हसळा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले म्हसळा ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात यंदा शासकीय मानवंदना देण्यात आली. आता ही मानवंदना कायमस्वरुपी परंपरा होईल, असे मनोगत यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

श्री धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवारी (22 एप्रिल) संपन्न झाला. त्यानंतर मंगळवारी (23 एप्रिल) चैत्र पौर्णिमेला सायंकाळी धाविरदेव मंदिराच्या भव्य प्रांगणात पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ झाला. यावेळी श्री धाविरदेव महाराजांना रायगड पोलिस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. रायगड जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. ग्रामदेवतेला मानवंदना देतेवेळी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचा मान श्री धावीर देवाचे मानकरी पुजारी म्हशिलकर परिवाराला देण्यात आला होता.

हेही वाचा… Raigad Phansad Sanctuary : फणसाडमधील पक्ष्यांची पर्यटकांना साद

या वर्षीच्या शासकीय मानवंदनेसाठी शासकीय मंजुरी मिळाली होती. भविष्यातही आता शासकीय मानवंदना सुरू राहणार असल्याने ग्रामस्थ मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. यंदा श्री धावीरदेव पालखी सोहळ्यात मंदिराभोवती पालखीच्या पाच फेऱ्या मारण्याची प्रथा पाहायला मिळाली तसेच भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले तसेच ग्रामस्थांच्या भरभराटीसाठी देवाला साकडे घातल्याचे तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा… Raigad Water Crisis : पाणी योजना की पाणीटंचाईची योजना?

यावेळी म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाने खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांच्या समवेत मंत्री अदिती तटकरे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी सभापती महादेव पाटील, समीर बनकर, ग्रामस्थ मंडळ सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतिहासात नोंद होणाऱ्या श्री धावीरदेव पालखी सोहळ्यात ग्रामदैवताला म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकांने शासकीय मानवंदना दिली.

यात्रोत्सव सांगता सोहळ्याला ग्रामस्थ मंडळ सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व भाविक आणि मान्यवरांचे स्वागत हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, सचिव सुशील यादव, ज्येष्ठ समाजसेवक सुनील उमरोटकर यांनी केले, तर सचिव सुशील यादव यांनी सर्वांचे विशेष आभार मानतानाच खासदार सुनील तटकरे यांचे मोलाच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.

(Edited by Avinash Chandane)

First Published on: April 24, 2024 10:47 PM
Exit mobile version