घरमहाराष्ट्रकोकणRaigad Water Crisis : पाणी योजना की पाणीटंचाईची योजना?

Raigad Water Crisis : पाणी योजना की पाणीटंचाईची योजना?

Subscribe

कर्जत तालुक्यातील ‘नांदगाव खुर्द’ ही जलजीवन योजना फसली आहे. कमी वीजदाबामुळे विठ्ठलवाडीला पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उद्भव साठा भरलेला असूनही वीजपुरवठा पुरेशा दाबामुळे होत नसल्याने महिलांच्या डोक्यावर पुन्हा पाण्याचा हंडा आलेला आहे.

दीपक पाटील : आपलं महानगर वृत्तसेवा

नेरळ : ‘भीक नको पण कुत्रे आवर’ या म्हणीची प्रचिती कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनांबाबत येत आहे. बहुतांश ठिकाणी ही योजना असून नसल्यासारखी झाली आहे. त्यामुळे महिलांना हंडामुक्तीचा आनंद केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे उद्भव आटले आहेत, तर विठ्ठलवाडी येथे उद्भव पाण्याने तुडुंब भरलेला आहे. पण विजेचा कमी दाबाने पुरवठा होत असल्यामुळे पाणी जलसाठवण टाकीत जात नाही. योजना असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे ही पाणी योजना आहे की पाणीटंचाई योजना, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरावा, त्यांचे जगणे सोपे व्हावे आणि पाण्य़ामुळे हाल होऊ नये यासाठी जलजीवन मिशन योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात योजना सुरू झाली असली तरी महिलांना आजही डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : जलजीवन योजना ठेकेदारांसाठी आहे का?

कर्जत तालुका आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागात आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. या डोंगराळ, दुर्गम भागात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊन ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सरकार दरवषी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न करते. मात्र एक ते दोन टँकर किती ठिकाणी आणि कसे पुरणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. 2021 मध्ये केंद्र शासनाने ‘हर घर नलसे जल’ अंतर्गत जलजीवन मिशन योजना आणली. मात्र ही योजना अनेक ठिकाणी कुचकामी ठरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : उरणकरांना 15 दिवसांतून एकदा ‘जल’दर्शन

नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील 70 घरांची वस्ती असलेल्या विठ्ठलवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना राबवण्यात आली होती. ‘नांदगाव खुर्द’ अशी ही योजना असून, यात विठ्ठलवाडी आणि डामसेवाडीचा समावेश होता. एकूण 72 लाखांच्या या योजनेत दोन्ही ठिकाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तर विठ्ठलवाडी खाली भुताची जाळ येथे विहीर असून, तिला पाणीदेखील मुबलक आहे. याच विहिरीला उद्भव ठेवण्यात येऊन ठेकेदाराने पाइपलाइन सगळीकडे फिरवली. गावात घरोघरी नळ बसवण्यात आले. मात्र ते नळ केवळ देखाव्याचे ठरले आहेत. कारण विहिरीत असलेल्या पंपातून पाणी टाकीपर्यंत पोहचतच नाही.

कमी वीजदाब असल्याने ही अडचण असल्याचे ग्रामस्थ आणि पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. परिणामी वाडीजवळ असलेल्या एका खासगी फार्ममधून ग्रामस्थ, लहान मुले दिवसभर पाणी भरण्यात त्यांचा वेळ घालवतात. गावात योजना झाली, पाण्याची टाकी बांधली, मात्र तो निव्वळ देखावा ठरला आहे. ठेकेदाराने पाइपलाइन वरच्यावर टाकली असल्याने ती अनेक ठिकाणी फुटली आहे. योजना सुरू झालेली नसताना ही अवस्था असल्याने आम्हाला पाणी मिळणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ठेकेदाराचे ढिसाळ काम

वाडीत पाण्याची टाकी बांधली, घरात नळ आले, मात्र टाकीत पाणीच नसेल तर ग्रामस्थांना पाणी मिळणार कसे? तसेच ठेकेदाराने ढिसाळ काम केले आहे. त्यामुळे कधी विजेचा दाब असला तरी टाकीतून पाणी सोडल्यानंतर फुटलेल्या पाइपातून ते वाहून जाते. म्हणून नवी पाइपलाइन टाकावी. – काशीनाथ गोसावी, ग्रामस्थ, विठ्ठलवाडी

अधिकाऱ्यांनी वणवण अनुभवावी

तकलादू योजनेमुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. लहान मुलेसुद्धा पाणी भरण्यात दिवस घालवतात. ठेकेदार, अधिकार्‍यांनी पाण्यासाठीची वणवण एकदा प्रत्यक्ष अनुभवावी. – शैला रमेश मुकणे, ग्रामस्थ, विठ्ठलवाडी

वीज समस्येवर उपाय काढू

योजनेचे काम अजून शिल्लक आहे. ग्रामस्थांची तक्रार असेल तर पाइपलाइन पुन्हा खोदून खाली टाकण्यात येईल. तसेच विद्युत दाब कमी मिळत असल्याने पाणी टाकीपर्यंत पोहचत नाही. विजेच्या समस्येबाबत काय उपाययोजना करता येईल यासाठी संबंधित विभागाशी चर्चा सुरू आहे.

– अनिल मेटकरी, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कर्जत

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -