सिध्दिविनायक मंदिराच्या खजिनदाराची सीबीआय चौकशी; आमदार सरवणकरांच्या मागणीला राज्य सरकारचा प्रतिसाद

सिध्दिविनायक मंदिराच्या खजिनदाराची सीबीआय चौकशी; आमदार सरवणकरांच्या मागणीला राज्य सरकारचा प्रतिसाद

मुंबईः सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार संजय सावंत यांची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी आमदार सदा सरवणकर यांनी विधानसभेत सोमवारी केली. या मागणीची राज्य शासनाने दखल घ्यावी, असे आदेश तालिका अध्यक्ष सुनील भुसारा यांनी दिले. ही मागणी पटलावरुन काढून टाकावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यास तालिका अध्यक्ष भुसारा यांनी नकार दिला.

आमदार सदा सरवणकर म्हणाले, आज दुपारी बागेश्वर महाराज मुंबईत आले होते. त्यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. बागेश्वार महाराज यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र बागेश्वर महाराज हे सिद्धिविनायक मंदिरात गेले तेव्हा पोलिसांना मंदिरात येण्यास मनाई करण्यात आली. बागेश्वर महाराजांच्या सुरक्षेसाठी पोलीस तेथे जात होते. मात्र त्यांना मनाई करणे अयोग्य आहे. बागेश्वर महाराजांना मंदिरात घेऊन त्यांचा घातपात करण्याचा कट होता का, असा संशय निर्माण होतो. परिणामी सिद्धिविनायक मंदिराचे खजिनदार संजय सावंत यांची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सदा सरवणकर यांनी केली.

या मागणीची सरकारने दखल घ्यावी, असे आदेश तालिका अध्यक्ष यांनी दिले. याला कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला. बागेश्वर महाराज कोण आहेत. मुळात त्यांनी हिंदु राष्ट्राची घेतलेली शपथ हे राज्य घटनेविरोधी आहे. घटना दुपारी घडली आहे. रात्री ती सभागृहात मांडणे योग्य नाही. आपले पोलीस सक्षम आहेत. पोलीस हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळू शकतात. त्यामुळे ही मागणी पटलावरुन काढून टाकावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. यास तालिका अध्यक्ष भुसारा यांनी नकार दिला. हा मुद्दा तपासून निर्णय घेतला जाईल, असे तालिका अध्यक्ष भुसारा यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. तेव्हापासून आमदार सरवणकर व ठाकरे गटामध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. आता सिद्धिविनायक मंदिराचे खजिनदार संजय सावंत यांचीच चौकशी करण्याची मागणी आमदार सरवणकर यांनी केल्याने नवीन वाद होण्याची चिन्हे आहेत.

 

First Published on: March 20, 2023 10:34 PM
Exit mobile version