पुण्याच्या कात्रज चौकातली वाहतूक कोंडी सुटणार!

पुण्याच्या कात्रज चौकातली वाहतूक कोंडी सुटणार!

कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल आणि नवले पुलापर्यंतच्या रस्त्यासाठी १३५ कोटी रुपये मंजूर करु, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. वडगाव (नवले पूल) ते कात्रज राष्ट्रीय महामार्ग या सुमारे पावणे चार किलो मीटर रस्त्याचे सहापदरीकरण आणि सेवा रस्त्याच्या कामाच्या कोनशिलेचे अनावरण शुक्रवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार योगेश टिळेकर, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे आदी उपस्थित होते.

कात्रज चौकाजवळच राजीव गांधी प्राणी संग्रहालय असून, येथील प्रस्तावित उड्डाणपूलावरील वाहनांच्या आवाजाचा त्रास संग्रहालयातील प्राण्यांना होऊ नये, म्हणून साऊंड बॅरीअर्स (ध्वनीरोधक) बसवण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले. कात्रज चौक ते नवले पूल या नियोजित सहापदरी रस्त्याच्या कामासाठी केंद्राकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिवसृष्टीसाठी सहापदरी रस्ता

‘‘या कामांतर्गत प्रस्तावित ७ मीटर रुंदीचे भुयारी मार्ग भविष्यातील गरज लक्षात घेऊन १० मीटर करण्यास मंजुरी दिली जाईल. छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहीत व्हावा व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन नवी पिढी तयार व्हावी, या हेतूने आंबेगाव येथे तयार करण्यात येत असलेली शिवसृष्टी लवकर पूर्ण होईल. ही शिवसृष्टी पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांना सहापदरी रस्त्याच्या सेवा रस्त्याचा फायदा होणार आहे. पुणे-सातारा महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामे पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. मात्र, यासंदर्भात बैठक घेऊन अडचणी दूर करण्यात येतील’’, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

First Published on: November 15, 2019 10:22 PM
Exit mobile version