…तर डॉक्टरांवर कारवाई

…तर डॉक्टरांवर कारवाई

शरद पवार

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारमार्फत रूग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, रूग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर पुढे येत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठातून डॉक्टर्स बाहेर पडतात. असे असतानाही डॉक्टरांनी पुढे न येणे हे दुर्दैव आहे. यापुढे अशाप्रकारे सेवा नाकारणार्‍या डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे कोरोनाच्या कामाला वाहून घेतल्याचे सांगत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२४) झालेल्या आढावा बैठकीनंतर बोलताना पवार बोलत होते. ते म्हणाले, देशात महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याकरिता तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री स्वतः यात पूर्णपणे लक्ष घालून चोवीस तास कार्यरत आहेत, असे सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती पाहून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहोत.

आणि त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, असेदेखील पवारांनी स्पष्ट केले. रूग्णसंख्या वाढत असल्याने बेड्सची संख्याही वाढवणे आवश्यक आहे, याकरिता नाशिक महापालिकेला आजच्या बैठकीत सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनबाबत विचारले असता ते म्हणाले, लॉकडाऊनबाबत माझी काहीही भूमिका नाही. याबाबतचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून स्थानिक स्तरावर घ्यायचा आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते यापुढे कोरोनासोबतच जगावे लागेल. मात्र, काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनामार्फत सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

आरोग्याप्रमाणे आर्थिक संकट मोठे असून, हे अर्थचक्र सुरू राहणे आवश्यक आहे. कामगार कोरोनाच्या भीतीने इतर राज्यात गेला. आता परत येण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यामुळे परिस्थिती सामान्य करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकला येण्याची इच्छा आहे. कदाचित तेही लवकरच नाशिकला भेट देतील, असे संकेतही त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी
१ऑगस्ट रोजी असलेल्या बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी एमआयएमने केली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात अल्पसंख्याक समाजाने सामंजस्याची भूमिका दाखवत ईद साध्या पद्धतीने साजरी केली. यंदाही राज्यातील अल्पसंख्याक समाज सामंजस्याची भूमिका घेईल, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले पवार…
=देवेंद्र फडणवीस व भाजपने कोरोना काळात राजकारण करू नये.=केंद्राच्या पॅकेजबाबत अद्याप माझ्या ज्ञानात भर पडलेली नाही.=लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा.=राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला कोरोनामुळे मोठा फटका बसला.=राज्यातील अर्थचक्राला गती मिळणे आवश्यक.=डॉक्टरांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ आणू नये.

भाजपने राजकारण करू नये
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील राज्यात दौरे करून सरकारच्या कामगिरीवर आरोप करत असल्याबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही देणे लागतो. ही वेळ राजकारण करण्याची नाही. सर्वांनी एकत्रित येऊन या परिस्थितीचा मुकाबला करणे आवश्यक आहे. फडणवीसांनीदेखील या कामात लक्ष घालावे आणि राजकारण करू नये, असा सल्ला पवार यांनी दिला.

डॉ. आरती सिंह यांची प्रशंसा
मालेगावमध्ये कोरोनाचा कहर होता तेव्हा नाशिक ग्रामीणच्या महिला पोलीस अधिक्षक आरती सिंह या मालेगावमध्ये तळ ठोकून होत्या, असे मला सांगण्यात आले. त्यामुळे आरती सिंह यांचे खरंच कौतुक आहे, असे गौरवोद्गार काढत शरद पवार यांनी नाशिकच्या इतर सर्व अधिकार्‍यांसमक्ष आरती सिंह यांच्या कामाची प्रशंसा केली.

First Published on: July 25, 2020 7:15 AM
Exit mobile version