सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांचं पासपोर्ट जप्त

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांचं पासपोर्ट जप्त

मेधा पाटकर

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं पासपोर्ट अखेर पासपोर्ट कार्यालयानं जप्त केलं आहे. त्यांच्यावर विविध ठिकाणी दाखल असलेल्या ९ प्रकरणांची माहिती त्यांनी पासपोर्ट कार्यालयापासून लपवून ठेवल्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. १८ ऑक्टोबरला त्यांना पासपोर्ट कार्यालयाकडून यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली होती. ३० नोव्हेंबरला यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत मिळावी, अशी विनंती मेधा पाटकर यांनी पासपोर्ट कार्यालयाला केली होती. मात्र, पासपोर्ट कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करत ९ डिसेंबर रोजी त्यांचा पासपोर्ट जप्त केला आहे. ६५ वर्षीय मेधा पाटकर यांना ३० मार्च २०१७ रोजी हा पासपोर्ट जारी करण्यात आला होता.

पासपोर्ट कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये यासंदर्भातलं स्पष्टीकरण मेधा पाटकर यांच्याकडे मागण्यात आलं आहे. ३० मार्च २०१७ रोजी कार्यालयाकडून पासपोर्ट घेताना तुमच्यावर दाखल असलेल्या केसेससंदर्भात तुम्ही माहिती दिली नाहीत. त्यामुळे तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना मेधा पाटकर म्हणाल्या, ‘ज्या प्रकरणांचा उल्लेख नोटीसमध्ये आहे, त्या सर्व केसेस अहिंसात्मक आणि शांततापूर्ण मार्गाने प्रकल्पबाधितांच्या हक्कांसाठी केलेल्या आंदोलनात दाखल करण्यात आलेल्या आहेत. नोटीस आल्यानंतर त्यासंदर्भातली कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. मात्र, कमी कालावधी आणि माझ्या दौऱ्यांमुळे ती मी जमा करू शकले नाही. म्हणून ४५ दिवसांचा कालावधी मी मागितला होता’.

First Published on: December 11, 2019 5:11 PM
Exit mobile version