किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगडावर एक दिवसीय ‘दुर्ग परीषद’

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगडावर एक दिवसीय ‘दुर्ग परीषद’

प्रातिनिधिक फोटो

शिवाजी महाराज्यांचा इतिहास सांगणारे असे हे राज्यातील किल्ले. मात्र सध्या या किल्ल्यांची अवस्था पाहिली तर प्रत्येक शिव प्रेमींचें मन दुखावते. आता याच महाराजांच्या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. राजेंनी नुसता पुढाकारच नाही तर रायगड प्राधिकरणाच्यावतीने एक दिवशीय ‘दुर्ग परिषदेचे’ आयोजन सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी केले आहे. या दुर्ग परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास १५० पेक्षा जास्त संस्था आणि संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच या परिषदेत शिवप्रेमींना देखील बोलावण्यात येणार असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.

किल्ल्यांचे संवर्धन होत नसल्याची राजेंची खंत

महाराजांची आठवण सांगणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन होत नसल्याची खंत संभाजीराजे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. आज ३५० पेक्षा जास्त किल्ले आहेत मात्र त्याचे संवर्धन होत नाही. त्यामुळे दुर्ग परिषदेच्या माध्यमातून शिवप्रेमी तसेच इतर संस्था आणि संघटना यांच्या कडून माहिती घेऊन इतिहास सांगणारे किल्ले अधिक कसे आकर्षक करता येतील याचा अहवाल केला जाईल असे संभाजी राजे यांनी सांगितले.

रायगड किल्ल्यासाठी ११३ कोटींचा खर्च 

दरम्यान महाराष्ट्राची शान असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ११३ कोटी खर्च केले जाणार असून, त्यातील २८ कोटी खर्च झाल्याची माहिती राजेंनी यावेळी दिली. तसेच रायगड किल्ल्याच्या ८०० पायऱ्या तयार झाल्या असून, अजून उरलेल्या १००० पायऱ्या पावसाळ्या अगोदर तयार होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे रायगडला हिस्टोरिकल लूक येण्यासाठी प्रयत्न करत असून, पाण्याची पाईप लाईन तसेच किल्ल्याला करण्यात येणाऱ्या लायटिंगची वायर अंडर ग्राउंड असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगड किल्ल्याचे काम पूर्ण व्हायला लागणार ६ ते ७ वर्ष

रायगड किल्ल्याचे काम शास्त्रीय पद्धतीने सुरू असून, महाराजांच्या किल्ल्यांचे पावित्र्य राखूनच काम केले जाणार आहे. त्यामुळे पूर्ण रायगड किल्याचे संवर्धन होण्यासाठी ६ ते ७ वर्षे अजून लागतील असे त्यांनी सांगितले. तसेच रायगड हेरिटेज हिलस्टेशन व्हावे ही आपली भूमिका असून, किल्ल्यासाठी गडपाल देण्यात यावा अशी देखील मी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

१० किल्ल्यांसाठी केंद्राकडून १५० कोटी 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील १० किल्ल्यासाठी केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, देवगिरी, शिवनेरी, सोलापूरचा जुना किल्ला, रायगड किल्ला यासह विदर्भातील दोन किल्ले अशा किल्ल्यांना १५० कोटी देण्यात येणार आहेत.

First Published on: February 8, 2019 7:59 PM
Exit mobile version