नागपूरमधील नाट्यसंमेलनात होणार ही विशेष गोष्ट

नागपूरमधील नाट्यसंमेलनात होणार ही विशेष गोष्ट

99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (सौजन्य-लोकमत)

पुढील आठवड्यातील २२ तारखेला नागपूरमध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ९९ वे नाट्यसंमेलनही सलग ६० तासांचे असणार आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या ९८ वे मुलुंड येथे रंगलेले नाट्य संमेलनसुद्धा सलग ६० तासांचे झाले होते. तसेच रात्रभर सुरू असलेल्या कार्यक्रमांना रसिकांनीही पसंती दिली होती. २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता नागपूर शहरात वाजत गाजत नाट्य दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ९९ व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते होणार आहे.

वाचा – ९९व्या अखिल भारतीय मराठी नाटसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

संमेलनात अनेक आकर्षणं 

यंदाचे नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटक कार प्रेमानंद गजवी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी उपस्थित असणार आहेत. उद्घाटन झाल्यानंतर २५ फेब्रुवारी पहाटेपर्यंत नागपूरच्या नाट्य नगरीत सलग कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या नाट्य संमेलनात अभिनेता भरत जाधव यांचे सही रे सही हे व्यावसायिक नाटक दाखवले जाणार आहे. तसेच आनंदवन येथील विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वरावानंदन या संगीतमय कार्यक्रमाने २५ फेब्रुवारीला पहाटे नाट्यसंमेलनाचे सूप वाजणार आहे. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांच्या सुफी गीतांवर आधारित मुक्ती ह्या संगीतमय कार्यक्रमाची पर्वणीही नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. त्याचसोबत विदर्भातील गाजलेल्या झाडेपट्टी रंगभूमीवरील अस्सल नाटकाचा आस्वादही घेता येणार आहे. तसेच विदर्भातील महाविद्यालयीन तरुणांच्या गाजलेल्या एकांकिकाही संमेलनात सादर होणार आहेत. तसेच प्रेमानंद गजवी यांची प्रकट मुलाखतही होणार आहे.

वाचा – नाट्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन

First Published on: February 12, 2019 12:04 PM
Exit mobile version