ST Workers Strike: निलंबनासह सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी रूजू व्हावे अन्यथा कारवाई करु, परिवहन मंत्र्यांचा इशारा

ST Workers Strike: निलंबनासह सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी रूजू व्हावे अन्यथा कारवाई करु, परिवहन मंत्र्यांचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. परंतु विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयीन समितीच्या पुढे असल्यामुळे संपामध्ये तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. कर्मचाऱ्यांना ५ ते २ हजार रुपयांची पगारवाढ जाहीर करण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासून कामावर हजर राहण्याचे आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली असून ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित आणि सेवा समाप्तीची कारवाईच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत त्यांनाही कामावर हजर राहण्याचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान १ ते १० वर्षापासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांनी वेतन वाढ केली आहे. तर १० ते २० वर्षांपासून कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये पगारवाढ करण्यात आली आहे. तसेच २० वर्षांपासून पुढे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या २ हजार रुपये पगारवाढ करण्यात आली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली त्यांनी हजर व्हावे

कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावामध्ये ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीने विचार केला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. आता जे कामगार गावाकडे आहेत त्यांनी परवा हजर व्हावे, ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्यांनी तात्काळ कामावर हजर व्हावे, ज्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस आली आहे त्यांनी देखील कामावर हजर व्हावे, हे कर्मचारी कामावर हजर झाल्यावर लगेच त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात येईल तसेच जे कर्मचारी हजर होणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी एसटी महामंडळाने दरमहा ६० कोटीची तूट आणि वर्षाला एकूण ७२० कोटींचा बोझा राज्य सरकारवर येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामावर हजर व्हावे असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. जर एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला तर राज्य सरकार योग्य कारवाई करणार असल्याचे अनिल परब म्हणाले आहेत.


हेही वाचा :  ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांच्या दहा घोषणा


 

First Published on: November 24, 2021 8:01 PM
Exit mobile version