स्टॅम्प पेपर ठरणार फुटीरांसाठी अडचणीचा

स्टॅम्प पेपर ठरणार फुटीरांसाठी अडचणीचा

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर लिहून देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे यापुढे पक्षातील फुटीरांनी असे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर पक्षाशी चुकीची वर्तणूक केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निश्चितच कायदेशीररित्या अडचणीची बाब ठरू शकेल, अशी माहिती अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

गेल्या महिनाभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच शिवसेना पक्षातील नगरसेवक, आमदार, खासदार यांची बंडखोरी हा एकच विषय प्रामुख्याने सर्वत्र चर्चिला जात असल्याचे आजवर दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी आणि शिवसेना पक्षाला लागलेली फुटीची वाळवी या पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्षप्रमुखांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यामुळेच की काय, शिवसेना पक्षप्रमुखांनी सेना कार्यकर्त्यांना ‘मी निष्ठावान’ असल्याबाबत थेट स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले. अनेक सेना कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी तसे लिहूनही दिले. मात्र, या पार्श्वभूमीवर कायदेशीररित्या बाजू जाणून घेण्यासाठी अ‍ॅड. जयंत जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता, अशाप्रकारे प्रतिज्ञापत्र लिहून देणार्‍यांनी बंडखोरी केली, तर ती कायदेशीररित्या फसवणूक ठरते. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे ही बाब त्यांच्यासाठी बंडखोरी करून जाऊ इच्छिणार्‍या पक्षातही संबंधितांना अडचणीचीच ठरणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. जायभावे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. एकूणच काय तर पक्षाची निष्ठा असल्याबाबत आता शिवसैनिकांनी स्टॅम्पपेपरवर लिहून दिले असल्याने त्याचा भंग म्हणजे फौजदारी कारवाई म्हणजेच कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे हे शिवसैनिकांना चांगलेच जड जावू शकते.

First Published on: July 27, 2022 2:39 PM
Exit mobile version