शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांवर नववर्षात निर्माण झालेले वाद

शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांवर नववर्षात निर्माण झालेले वाद

वर्ष २०२० मध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दल निर्माण झालेले वाद

वर्ष २०२० ची सुरुवात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक वाद निर्माण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात आली. यावरुन बराच वाद निर्माण झाला. भाजप विरोधातील सर्व पक्षांनी जोरदार टीका केली. तर मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यानंतर भाजपने काँग्रेसवर तोंडसूख घेतले. तर महाराष्ट्रात देखील शिवाजी महाराज यांचा अपमर्द करणारे पुस्तक लिहिले गेले आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण या सर्व वादांवर एक प्रकाश टाकुया.

१. दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकाचं ११ जावनेवारी २०२० रोजी भाजपच्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली. या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.

२. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी मागणी केली होती. खासदार संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं. आज के शिवाजी – नरेंद्र मोदी या पुस्तकावरून राजकीय वादंग निर्माण झालं. यावर प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी केली होती. याला उत्तर देताना शिवसेना नाव काय वंशजांना विचारून दिले होते का? असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. याच विषयावरून बुधवारी १५ जानेवारी २०२० ला पुन्हा एकदा संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना डिवचत वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असं वादग्रस्त विधान केलं.

३. “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकाचा वाद सुरु असतानाच छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा एक व्हिडिओ २२ जानेवारी २०२० ला यू-टय़ुबवर झळकला. ‘तान्हाजी’ चित्रपटातील एका गीताला अनुसरून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवरायांच्या, गृहमंत्री अमित शहा यांना तान्हाजीच्या भूमिकेत तर उदयभान राठोडच्या भूमिकेत ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांना दाखवण्यात आलं होतं. यावर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘पॉलिटिकल किडा’ वळवळला, असा राजकीय आरोप होऊ लागला. महाराष्ट्र सरकारनेही या अवमानकारक व्हिडिओची गंभीर दखल घेत व्हिडिओ तत्काळ हटवावा, अशी विनंती यू-ट्युबला केली. त्यानुसार यू-ट्युबने हा वादग्रस्त व्हिडिओ तत्काळ हटवला.

४. “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकावरुन झालेल्या वाद थंड होताच भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. “गेल्या दीड वर्षात देशातील विविध राज्यांमध्ये झालेली विधानसभा निवडणूक, त्यानंतर पार पडलेली लोकसभा निवडणूक आणि गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानभा निवडणुका यांचे निकाल हे स्पष्ट करत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याची प्राज्ञा कुणामध्येही नाही. संपूर्ण देशाच्या जनतेने मोदींना आणि मोदींनी जनतेला आपलंसं करुन घेतलं आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद!” अशा आशयाचं ट्विट ११ फेब्रुवारी २०२० ला उमा भारती यांनी केलं. या ट्विटमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाले.

५. १२ फेब्रुवारी २०२० ला मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये प्रशासनाने बुलडोझरने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. प्रशासनाच्या या कृतीविरोधात छिंदवाडा-नागपूर हायवे वर काही हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्र भाजपाने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करुन शिवसेना आणि काँग्रसेवर जोरदार टीका केली. यावर पुतळा बसवण्यापूर्वी कोणतीही आवश्यक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली.

६. “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच “शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव” या पुस्तकारवरुन वादाला तोंड फुटलं. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप करत पुस्तकाचे लेखक डॉ. विनोद अनाव्रत आणि पुस्तकाचे प्रकाशक पुण्याचे सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात १७ फेब्रुवारी २०२० ला अमरावती येथे पोलीस आयुक्त्यांकडे पहिली तक्रार दाखल करण्यात आली.

First Published on: February 19, 2020 12:40 PM
Exit mobile version