‘सन २०२२ – सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘सन २०२२ – सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – उपमुख्यमंत्री अजित पवार

'सन २०२२ - सर्वांसाठी घरे' या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य शासनाचे आश्वासक पाऊल - उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) माध्यमातून सर्वसामान्यांची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे २ हजार ९०८ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला असून या माध्यमातून ‘सन २०२२ – सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य शासनाने आश्वासक पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ऑनलाईन बैठक पार पडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनेतील २ हजार ९०८ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करणे या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई आदी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की,” गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी म्हाडाने पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. सोडतीतील विजेत्या यशस्वी अर्जदारांना सदनिकांचा ताबा लवकरात लवकर देण्यात यावा, त्यासाठी काही अडचण असल्यास त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन देण्यात आले.  लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे सदनिकांसाठी सोडत प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होत असून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणाच्याही फसवणुकीला बळी न पडता पुणे मंडळाने घोषित केलेल्या सोडतीत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे  सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी सांगितले की, म्हाडा ही सर्वसामानांच्या जिव्हाळ्याची संस्था असून पुणे मंडळाच्या अखत्यारीतील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ९०८ सदनिका अत्यंत माफक किमतीत उपलब्ध होणार आहेत. राज्य शासन सर्वाना हक्काचा निवारा मिळवून देण्यास कटिबद्ध असून यादृष्टीने शहरी व ग्रामीण भागात विविध गृह योजनांची अंमलबजावणी सुरु आहे.” असेही ते म्हणाले .       https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिनांक २९ मे, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची सोडत कार्यक्रम पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

प्रास्ताविक ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) या माध्यमातून पुणे जिल्हयात म्हाळूंगे (चाकण) येथे २०९, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ४३२ अशा एकूण ६४१ सदनिका. या सर्व सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.
म्हाडा गृहनिर्माण योजना
अल्प उत्पन्न गटासाठी मोरवाडी पिंपरी (पुणे) येथे १४ सदनिका

मध्यम उत्पन्न गटासाठी मोरवाडी पिंपरी येथे २ सदनिका

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना
२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी पुणे महानगर पालिका हद्दीतील लोहगाव, बाणेर, हडपसर, धनकवडी, खराडी, वडगाव शेरी, येवलेवाडी येथील ३०० सदनिकांचा समावेश आहे.
तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपळे निलख, ताथवडे, किवळे, पुनावळे, मोशी, वाकड, रावेत,  रहाटणी, चरोली, चिखली, उरवडे, डुडुळ गाव येथील ४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य
सदर योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी जुळे सोलापूर येथे ५ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी जुळे सोलापूर येथे ६३ सदनिका, चाकण-म्हाळुंगे-इंगळे येथे ४९९ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी चाकण-म्हाळुंगे-इंगळे, चिखली येवलेवाडी, वडमुखवाडी येथे ८६२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी चाकण-म्हाळुंगे-इंगळे येथे ६७ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास,फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.


हे हि वाचा – ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या…’; आनंद शिंदेंचा फडणवीसांना टोला

 

First Published on: April 13, 2021 1:05 PM
Exit mobile version