…तर उपमुख्यमंत्री पदही सोडावं लागेल, भाजप नेत्याचा फडणवीस यांना टोला

…तर उपमुख्यमंत्री पदही सोडावं लागेल, भाजप नेत्याचा फडणवीस यांना टोला

संग्रहित छायाचित्र

तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. तसेच हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी फडणवीस यांना टोला लगावला.

सुब्रह्मण्यम स्वामींनी सोलापूर दौऱ्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी आव्हान देऊन सांगतो की हे कॉरिडॉर नाही होणार आणि जास्त बोलला तर तो उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, अस म्हणत स्वामींनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला. कॉरिडॉरची इतकी काय घाई आहे. त्याऐवजी चंद्रभागा नदी स्वच्छ करा. येथे एखादं विमानतळ बांधा. या ठिकाणी अनेक लोकं येऊन महाआरतीमध्ये सहभागी होतात. त्यामुळे आधी ते करा. कारण विकासकामांमुळे सर्व काही छान होईल, असं स्वामी म्हणाले.

कॉरिडॉरला विरोध कशासाठी?

पंढरपूरचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा राबविताना विठ्ठल मंदिर परिसरासह अन्य भागातील मिळकती बाधित होणार असल्यामुळे येथील स्थानिकांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे.

…तर सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील 

पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपूर शहर आणि तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.


हेही वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या


First Published on: December 24, 2022 10:22 PM
Exit mobile version