मटण घट्ट… विषय कट्ट

मटण घट्ट… विषय कट्ट

कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला यश

कोल्हापुरातील मटण दराविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला तब्बल तीन आठवड्यानंतर सर्वपक्षीय कृती समितीला यश आले आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे कृती समिती आणि विक्रेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मटणाचा दर प्रतिकिलो ४८० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनामुळे प्रतिकिलो ११० रुपये दर कमी झाला आहे.

मटण विक्रेत्यांनी ऐन दीपावलीत भाऊबीज सणाच्यावेळी मटण दरात वाढ केल्याने कोल्हापूरकर नाराज झाले होते. मटण दरात प्रतिकिलो ४५० रुपयांवरून ५७० पर्यंत वाढ झाल्यावर कसबा बावडा येथे दरवाढीविरोधात पहिली ठिणगी पडली. बावड्यात मटण दुकाने बंद पाडल्यानंतर तेथील स्थानिक विक्रेत्यांनी मटणाचा दर ४६० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण शहरातील विक्रेत्यांनी मटण दर कमी करण्यास विरोध केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राजारामपुरी आणि शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाने थेट प्रतिकिलो ४२५ रुपये दराने मटण विक्री केली. शहराच्या आसपास मटणाचा दर प्रतिकिलो ४२० ते ४५० रुपये असताना शहरातील मटण विक्रेते दरावर ठाम राहिल्याने सर्वपक्षीय कृती समितीने त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.

मटण दरवाढीविरोधात कृती समितीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलक आणि मटण विक्रेत्यांच्या संयुक्त बैठक झाली. मटण विक्रेत्यांनी मटणाचा दर ५६० रुपयांवर ५४० रुपये करण्याची तयारी दर्शवली पण आंदोलक प्रतिकिलो ४६० रुपये दरावर ठाम होते. अखेर शहर आणि ग्रामीण भागातील मटण दराच्या तफावतीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महानगरपालिका आरोग्यधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीला तीन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

अखेर विक्रेते नमले

पण मटण विक्रेते प्रतिकिलो ५४० रुपये दरावर ठाम राहिले. अखेर शिवाजी पेठ, राजारामपुरीसह शहरातील प्रमुख पेठात दराविरोधात असंतोष जाणवू लागला. पेठांतील मटण विक्रीची दुकाने बंद करण्यात आली. कृती समितीने मटण दर कमी करण्यासाठी विक्रेत्यांना अल्टिमेटम दिल्यावर मंगळवारी शिवाजी मंदिरात बैठक झाली. बैठकीत खाटीक समाजाने प्रतिकिलो ५०० रुपये दर करण्याची तयारी दर्शवली. पण त्यांच्या निर्णयाला कृती समितीने कडाडून विरोध केला. कृती समितीने ४७० रुपये दर करण्याची तयारी दर्शवली. पण मटण विक्रेत्यांनी नकार दिला. कृती समितीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी चर्चा करुन प्रतिकिलो ४८० रुपये दर मान्य करण्याची विनंती खाटीक समाजाला केली. समाजाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन खाटीक समाजाने प्रतिकिलो ४८० रुपये दराला मान्यता दिली.

First Published on: December 11, 2019 5:56 AM
Exit mobile version