पालिकेच्या योजनांना यश! हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यंदा पाणी साचलं नाही

पालिकेच्या योजनांना यश! हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यंदा पाणी साचलं नाही

मुंबई महापालिकेने जवळजवळ १४० कोटी रुपये खर्चून केलेल्या यशस्वी उपाययोजनांमुळे यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडूनही हिंदमाता व किंग्जसर्कल गांधी मार्केट परिसरात दरवर्षीप्रमाणे पाणी साचून न राहता त्याचा काही कालावधीतच जलदगतीने निचरा झाला. त्यामुळे दरवर्षी या दोन्ही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना, दुकानदारांना आणि वाहतूक व्यवस्थेला होणाऱ्या त्रासापासून मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा पालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिली. (Success to the plans of the municipality! Hindmata, King’s Circle did not get waterlogged this year)

हेही वाचा – करून दाखवलं! तुफान पावसातही हिंदमाता भरलं नाही, आदित्य ठाकरेंचे ट्विट

विशेष बाब म्हणजे किंग्जसर्कल व हिंदमाता येथील दुकानदार, व्यापारी यांनीही यंदा पालिकेने काय जादूची काडी फिरवली आणि पावसाळी पाण्यापासून आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून दरवर्षी आमचे लाखो रुपयांचे होणारे नुकसान वाचले असल्याचा दावा काही दुकानदार व व्यापारी बांधवांनी केला आहे.

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास व त्याचवेळी समुद्रात मोठी भरती असल्यास सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामध्ये, हिंदमाता व किंग्जसर्कल येथे तर दरवर्षी कमरेपर्यंत पावसाळी पाणी साचत असे. त्यामुळे नागरिकांना ये – जा करणे कठीण होत असे. तसेच, वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा विपरित परिणाम होत असे. त्याचप्रमाणे किमान गुडघाभर ते कमरेप्रयत्न पाणी साचल्याने व ते पाणी रस्त्यालगतच्या आजूबाजूच्या दुकानात, हॉटेल्समध्ये, सोसायटीमध्ये शिरत असे. त्यामुळे याच पाण्यामधून वाट काढत नागरिकांना ये – जा करावी लागत असे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची ही समस्या गेल्या ४५ वर्षांपासून किंग्जसर्कल परिसरातील नागरिकांना व व्यापारी लोकांना भेडसावत होती, असे कपडे विक्रेते हरी ओम शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – हिंदमाता, मिलन सब वेमध्ये यंदा तुंबणार नाही; आदित्य ठाकरेंचा दावा

हिंदमाता येथील पाणी निचऱ्यासाठी भूमिगत पाण्याच्या टाक्या

हिंदमाता परिसरात दरवर्षी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या मात्र त्या प्रत्येक वेळी फेल ठरत होत्या. अखेर जपानच्या धर्तीवर हिंदमाता येथील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने गेल्या दोन वर्षात प्रमोद महाजन कलापार्क येथे १.६२ कोटी लिटर क्षमतेच्या पहिल्या भूमीगत टाकीचे काम पूर्ण केले. तर सेंट झेव्हीयर्स मैदानाखाली १.०५ कोटी लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधली आहे. आणखीन एक पाण्याची टाकी प्रमोद महाजन कलापार्क परिसरात दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आणखीन १.९९ कोटी लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. तसेच, सेंट झेव्हीयर्स मैदानाखाली आणखीन १.८१ कोटी लिटरची टाकी उभारण्यात येत आहे.सध्या दोन टाक्याचे काम पूर्ण झाले असून तिसऱ्या टाकीचे काम पूर्णत्वाच्या मार्गवर आहे.
तर चौथी टाकी पुढील तीन महिन्यात काम हाती घेऊन पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र हिंदमाता येथील पावसाचे पाणी यंदा दोन टाक्यात मोठ्या पंपिंगमार्फत पाणी साठवून पुढे त्याचा निचरा ब्रिटानीया पंपिंग स्टेशनमार्फ़त करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदमाता येथे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पावसाळी पाण्याच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. हिंदमाता येथील एकूण कामावर १२० कोटी रुपये खर्चण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.

किंग्जसर्कल गांधी मार्केट परिसरात मिनी पंपिंग स्टेशनमुळे दिलासा

किंग्जसर्कल गांधी मार्केट येथे सखल भाग असल्याने गेल्या ४५ वर्षांपासून पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत ते कमरेपर्यंत पाणी साचत असे. मात्र यंदा या ठिकाणी २१ कोटी रुपये खर्चाचे मिनी पंपिंग स्टेशन उभारल्याने व पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत जलवाहिनी टाकल्याने या ठिकणी साचणाऱ्या पाण्याचा काही तासात निचरा होत आहे. त्यामुळे या परिसरातील सोसायटी, नागरिक, दुकानदार, व्यापारी आणि रस्ते वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केला आहे.

यावेळी, गांधी मार्केट येथील हरी ओम शुक्ला यांनी, आम्हाला गेल्या ४५ वर्षात प्रथमच पावसाळी पाणी साचण्यापासून दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने दुकानदारांचे दरवर्षी होणारे लाखो रुपयांचे नुकसान वाचले असल्याचे सांगितले.

First Published on: July 15, 2022 8:52 PM
Exit mobile version