ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांना एक वर्षाची शिक्षा

ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांना एक वर्षाची शिक्षा

 

नाशिकः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख व माजी नगरसेवक सुधाकर भिकाजी बडगुजर यांना नाशिक सत्र न्यायालयाने बुधवारी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बडगुजर यांना जामीन मंजूर झाला आहे. ते या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

सरकारी कामात अडथळा करणे व सहाय्यक आयुक्तांना अरेरावी केल्याचा ठपका बडगुजर यांच्यावर होता. त्यासाठी दोषी धरत नाशिक न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांनी बडगुजर यांना शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर व राकेश निंबा शिरसाठ यांनाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

या तिघांना नाशिक सत्र न्यायालयाने सीआरपीसी कलम ३५३ प्रमाणे एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, तसेच कलम ३७ आणि १३५ प्रमाणे सहा महिने कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील रवींद्र निकम यांनी दिली.

दरम्यान बडगुजर हे नाशिकमधील ठाकरे गटाचे आक्रमक नेतृत्त्व मानले जाते. गेल्या वर्षी खासदार संजय राऊत यांंनी नाशिक दौरा केला होता. त्यावेळी बोरस्ते यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला बडगुजर यांनी उत्तर दिले होते. खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौर्‍यात केलेले आरोप बोरस्तेंच्या फार जिव्हारी लागलेले दिसतात. बोरस्तेंच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, हा चायनीज माल आहे. जास्त काळ आपल्या पक्षात टिकणार नाही. त्याचा डीएनए चेक केला पाहिजे. या प्रसंगाची आठवण राऊत यांनी करुन दिली. त्याचा बोरस्तेंना राग आला आणि त्या भावनेतून पत्रकार परिषद घेतली, असा पलटवार बडगुजर यांनी केला होता.

बडगुजर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही गेल्या वर्षी निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देत आहेत. अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केली होती.

First Published on: February 15, 2023 9:09 PM
Exit mobile version