फडणवीसांनी अजितदादांना मध्येच थांबवलं आणि ‘त्या’ शपथविधीचा गौप्यस्फोट टळला!

फडणवीसांनी अजितदादांना मध्येच थांबवलं आणि ‘त्या’ शपथविधीचा गौप्यस्फोट टळला!

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये विरोधी बाकांवर बसलेल्या भाजप आणि मित्रक्षांकडून सत्ताधारी असलेल्या महाविकासआघाडीच्या आमदारांना आणि मंत्र्यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. त्यामुळे अधिवेशन सुरू झाल्यापासून रोजच इथे नवीन काहीतरी घडत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या तरुणांच्या मुद्द्यावर आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असताना अचानक विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधी शपथविधी आणि नंतर राजीनाम्यावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे दोन्हीकडच्या आमदारांमध्ये अनेकांनी भुवया उंचावल्या. खुद्द अजित पवारच या मुद्द्यावर उत्तर द्यायला उभे राहिल्यानंतर मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बसल्या जागेवरूनच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा आशयाची विनंती केली आणि कामकाज पुढच्या मुद्द्याकडे सरकलं!

नक्की झालं काय होतं?

त्याचं झालं असं, की विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. विरोधी पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात सरकारला प्रश्न विचारला. या आंदोलनकर्त्या तरुणांच्या मागण्यांचा सरकार कधी विचार करणार? अशी विचारणा त्यांनी सरकारला केली. तसेच, यासंदर्भात सरकार काही कारवाई करून पावलं उचलणार आहे का? याबाबत त्यांनी विचारणा देखील केली.

‘दादा म्हणजे फैसला ऑन द स्पॉट’

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेत अजित पवारांनी महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत येण्याआधी भाजपसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्र्यांसोबत भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीचा उल्लेख केला. ‘या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे. दादा म्हणजे फार विचार वगैरे न करता फैसला ऑन द स्पॉट. रात्रीतून निर्णय घेऊन सकाळी त्यांनी शपथ घेतली होती. मग हा निर्णय घ्यायला दादांना अडचण नाही’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा – मराठी भाषा सक्ती विधेयक विधानसभेतही मंजूर; कायदा लागू!

…आणि अजितदादा उत्तराला उभे राहिले!

चंद्रकांत पाटलांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार उभे राहिले. त्यांच्या मुद्द्यांना अजित पवारंनी सविस्तर उत्तर देखील दिलं. त्यामुळे शपथविधीचा मुद्दा त्यांच्या डोक्यातून गेला असावा असंच क्षणभर वाटलं. मात्र, लागलीच दादांनी परतफेड करण्याच्या आविर्भावात चंद्रकांत पाटलांना उत्तर द्यायला सुरुवात केली. ‘अध्यक्ष महोदय, मघाशी बोलता बोलता चंद्रकांत पाटील यांनी माझ्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित केला..’, असं अजितदादांनी म्हणताच समोरच्या बाकांवर बसलेले विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाव्य धोक्याची जाणीव झाली आणि त्यांनी लागलीच अजित पवारांना थांबवलं. ‘या मुद्द्यावर मीही काही बोलत नाही आणि तुम्हीही काही बोलू नका’, अशी विनंतीवजा मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावर फक्त ‘ते तुम्हीही ऐकायचं नाही आणि मीही ऐकायचं नाही’, एवढंच म्हणून अजित पवार खाली बसले आणि फडणवीसांसह सगळ्याच विरोधी बाकांवरील सदस्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.


हा व्हिडिओ पाहिलात का? – उद्धव ठाकरेंच्या भाषणात आल्या ‘पंचलाईन’!
First Published on: February 27, 2020 5:25 PM
Exit mobile version