वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहितेची आत्महत्या

वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहितेची आत्महत्या

नाशिक : शहरात शनिवारी (दि.३) वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करताना दिसून आल्या मात्र, दुसरीकडे जेलरोड येथे सासरच्या जाचास कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री गोकुळ बोडके (२९) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती गोकुळ वसंत बोडके, सासू छायाबाई वसंत बोडके, सासरे वसंत रखमा बोडके (सर्व रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालयामागे, त्रिमूर्तीनगर, जेलरोड, नाशिक) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

मृत भाग्यश्रीचा भाऊ विजय सानप (रा. करजगाव, ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीनुसार, भाग्यश्रीचा विवाह २०१७ मध्ये मेडिकल चालक गोकुळशी झाला. गेल्या दीड वर्षांपासून गोकुळचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. ही बाब भाग्यश्रीला समजली असता तिने विरोध केला. त्यामुळे भाग्यश्री व गोकुळमध्ये वाद सुरु झाले. माहेरुन चार लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून आधीच छळ सुरु होता. याबाबत तिने आई-वडिलांनाही माहिती दिली. ती एक महिन्यांपूर्वी (करजगाव) माहेरी आली होती. तिच्या कुटुंबाने घरगुती भांडणे असल्याने समजूत काढून आठ दिवसांपूर्वीच तिला सासरी पाठविले.

भाग्यश्री शनिवारी (दि. ३) वटसावित्री पौर्णिमेसाठी पूजेची तयारी करत होती. तीन वर्षांपासून भाग्यश्रीचे चार तोळ्याचे मंगळसूत्र तिच्या सासरच्यांकडे होते. पूजेला जायचे असल्याने मंगळसूत्र तिने सासरच्यांकडे मागितले. त्यातून घरात वाद सुरु झाले. त्यानंतर भाग्यश्रीने दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तिला सासरच्या मंडळींनी बिटको रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. दरम्यान, जोपर्यंत गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातलगांनी जिल्हा रुग्णालयात घेतली. जिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानुसार कुुटंबाविरोधात भाग्यश्रीचा शारीरीरक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शनिवारी मध्यरात्री दाखल झाला. मृत भाग्यश्रीच्या पश्चात एक मुलगा आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एम. काकड करीत आहेत.

First Published on: June 5, 2023 2:00 PM
Exit mobile version